ठाणे : न्यायालयाच्या आदेशाने मुलीचा ताबा पतीला मिळाला, तरीही त्या मुलीला घेऊन तीन वर्षांपूर्वी पळालेल्या मुंब्रा येथील एका मातेला ठाणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली.मुंब्रा येथील अब्बास अली अकबर अली या भारतीय नागरिकत्व मिळालेल्या इराणी नागरिकाने ११ नोव्हेंबर २०१० रोजी नजमासोबत (बदललेले नाव) विवाह केला. मूलबाळ होत नसल्याने त्यांनी टेस्टट्यूब बेबी उपचारपद्धतीचा अवलंब केला. २५ जानेवारी २०१३ रोजी त्यांना मुलगी झाली. सकिनाच्या जन्मानंतर पतीपत्नीमध्ये वाद होऊ लागले. नजमा तिच्या पतीकडे नेहमी पैशांची मागणी करायची. तिची मागणी अब्बास अलीने वेळोवेळी पूर्ण केली. पतीपत्नीमधील वाद अखेर कौटुंबिक न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने मुलीचा कायमस्वरूपी ताबा अब्बास अली यांना दिला. १३ आॅगस्ट २०१४ रोजी नजमा मुलीला घेऊन नातेवाइकांकडे गेली. ६ डिसेंबर २०१४ रोजी अब्बास अलीने पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुंब्रा पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी या मायलेकीचा शोध घेतला. परंतु, बरेच प्रयत्न करूनही त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे अब्बास अली यांनी २०१५ साली मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. तरीही यश न मिळाल्याने अब्बास अली यांच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी नजमाविरुद्ध ८ आॅक्टोबर २०१६ रोजी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अखेर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेची मदत मागितली. (प्रतिनिधी)
मुलीला पळवणारी माता तीन वर्षांनंतर अटक
By admin | Published: April 26, 2017 11:55 PM