ठाणे : फेब्रुवारी महिन्यापासून ठाण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा एकप्रकारे उद्रेकच झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या कालावधीत रुग्णसंख्या तर वाढलीच; शिवाय मृत्युदरही वाढला. रुग्णसंख्या वाढत असताना शहरात कोविडचा कचराही वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरात कोविडचा ८७ मेट्रिक टन कचरा निर्माण झाल्याची माहिती महापालिकेने दिली. मागील वर्षी याच कालावधीतील ९२ दिवसांत ४५ हजार ६०५ किलो जैववैद्यकीय कोविड कचरा निर्माण झाला होता. त्या तुलनेत आता दुसऱ्या लाटेत हा कचराही दुपटीने वाढला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला एक लाख २४ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, आतापर्यंत एक हजार ७५८ बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १७ हजार १४३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजार ५९२ इतकी आहे. फेब्रुवारी अखेरपासून ठाण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दस्तक दिली. त्यानंतर दिवसाला पंधराशे ते अठराशे रुग्ण रोज आढळत होते. त्यांच्यासाठी रुग्णालयात बेडही मिळणे दुरापास्त झाले होते. परंतु, आता काही प्रमाणात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. सध्या महापालिका हद्दीत ४१ खासगी कोविड रुग्णालये तर महापालिकेची ग्लोबल, पार्किंग प्लाझा, मुंब्रा कौसा हॉस्पिटल, हाजुरी, भायंदरपाडा येथे क्वारंटाईन केंद्रे आहेत. या ठिकाणाहून निघणारा अँटिजन टेस्ट चाचणीसह कोविड प्रतिबंधक साहित्य, जैववैद्यकीय कचरा ४८ तासांच्या आत कळवा तसेच तळोजा येथील बायोमेडिकल वेस्टच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली असली तरी महामारीचा खरा विळखा मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर होता. फेब्रुवारीत कोविड कचरा १५ हजार ९०३ किलो, मार्चमध्ये २३ हजार ५८५ तर एप्रिल महिन्यात सर्वाधिक ४७ हजार ५३१ किलो कचरा गोळा झाला असल्याचे सांगितले. गृहविलगीकरणातला जैवकचरा म्हणजे हॅण्डग्लोव्हज, पीपीई किट असेल तर तो पिवळ्या रंगाच्या पिशवीत गोळा केला गेल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले. यानुसार आतापर्यंत म्हणजे अवघ्या तीन महिन्यांत महापालिका हद्दीत कोविडचा ८७ मेट्रिक टन कचरा निर्माण झाला असून, त्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.