ठाणे : मान्सूनमध्ये घडणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि प्रतिासाद कालावधी कमी करण्याच्या दृष्टीकोणातून ठाणे महापालिकेने तीन तात्पुरती बिट फायर स्टेशन कार्यान्वित केली आहेत. यातील ओवळा येथील फायर स्टेशन कायमस्वरुपी उभारण्यात येणार आहे. तसेच चिरागनगर आणि देसाई गाव येथेदेखील नव्याने कायमस्वरुपी फायर स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिल्याने येत्या काही महिन्यात ती सुरू होतील, असा विश्वास अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.घोडबंदर भागातील तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन केंद्र कायमस्वरुपात आरक्षित भूखंडावर उभारण्यात येणार आहे. यासाठी ६.७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच चिरागनगर येथील सर्व्हिस रस्ता भागातील आरक्षित भूखंडावरही नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी सात लाख ९९ हजार ९०१ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर दिव्यापाठोपाठ देसाई गाव येथेदेखील नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. दिवा आणि आजूबाजूची लोकसंख्या वाढत असल्याने येथे केवळ मुंब्य्राचेच अग्निशमन केंद्र सध्या अस्तित्त्वात आहे. परंतु, एखादी दुर्घटना घडल्यास येथील केंद्रातून गाडी जाण्यासाठी तासाचा अवधी जात होता. त्यामुळे देसाई गावात नव्याने ४ कोटी ३० लाख ९६ हजार १७ रुपये खर्चून नवे केंद्र उभारण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या तिन्ही केंद्राच्या कामांना सुरुवात होणार आहे.लोकसंख्येनुसार फायर स्टेशनची गरजशहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात आहे. त्यानुसार, १४ फायर स्टेशनची गरज आहे, परंतु सध्या ६ फायर स्टेशन कार्यान्वित असून, नव्याने तीन केंद्रे तयार होणार आहेत. तात्पुरते ओवळा (कावेसर) अग्निशमन केंद्र कायमस्वरूपी होणार आहे.आनंदनगर, माजिवडा, दिवा, रुस्तमजी, हिरानंदानी इस्टेट, देसाई गाव आदी ठिकाणीदेखील फायर स्टेशन मंजूर झाली असून, त्यांच्या कामांच्या वर्कआॅर्डर काढल्या आहेत, परंतु त्यांची कामे पावसाळ्यानंतर केली जाणार आहेत.
ठाण्यात तीन नवीन अग्निशमन केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:56 AM