अंबरनाथ : कर्जतहून मुंबईकडे जाणाºया उपनगरीय लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून अंबरनाथ रेल्वे स्थानकात तुटल्याने डब्यातील तीन प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती. परिणामी, प्रवाशांचे अतोनात हाल झाले.कर्जतहून निघालेली ही जलद लोकल अंबरनाथ स्थानकातील फलाट क्रमांक-३ वर दुपारी २.५६ वाजता आली. अचानक या लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून तुटला. लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या कमलेश जादवानी यांना त्याचा फटका बसला व ते जखमी झाले. अन्य एक प्रवासी विनय बेडेकर हेही जखमी झाले. त्यांना कल्याणच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सचिन घाग या प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.या घटनेनंतर मुंबईकडील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. एकामागोमाग एक लोकल उभ्या होत्या. पेंटाग्राफच्या दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याने कल्याणहून इंजीन मागवून ही लोकल फलाट क्र.-३ वरून हलवण्यात आली. त्यानंतर, ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम करून रेल्वेसेवा पूर्ववत झाली. अडीच तास एकही लोकल कर्जत मार्गावरून मुंबईकडे न गेल्याने अंबरनाथ, बदलापूर स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अनेक प्रवाशांनी लोकल सुरू होण्याची वाट न पाहता थेट कल्याण गाठले आणि तेथून मुंबईच्या दिशेने प्रवास केला.पावसाने मध्य रेल्वे खोळंबलीमुंबई : दीर्घ कालीन विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली. शुक्रवार मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शनिवारी सकाळी उपनगरांत जोर धरला. यामुळे भांडूप, कांजूर मार्ग स्थानकांजवळील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले. परिणामी सकाळच्या सत्रातील मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने सुरु होती.साधारण महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबई उपनगरात दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसाचे पुनरागमन होताच मध्य रेल्वेचा वेग मंदावला. भांडूप, कांजूर मार्ग, विक्रोळी स्थानकाजवळील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने मरेच्या लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. लोकल उशिराने सुरु असल्यामुळे ठाणे, मुलूंड, भांडूप, घाटकोपर, कुर्ला स्थानकांमध्ये प्रवासी गर्दी वाढली. सकाळच्या सत्रातील बहुतांशी लोकल लेटमार्कसह धावत होत्या. याचा परिणाम दुपारच्या सत्रातील लोकल सेवांवर देखील दिसून आला.रुळावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधित स्थानकांतील पाण्याचे पंप स्थानक प्रशासनाकडून तात्काळ कार्यान्वित करण्यात आले. परिणामी मुसळधार पावसाच्या आगमनाने लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध स्थानकांवर उद्घोषणेद्वारे याबाबत माहिती देण्यात येत होती.
लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने तीन प्रवासी जखमी, मुंबईकडे जाणारी लोकलसेवा अडीच तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:25 AM