ठाणे : ठाणे महापालिका शहरातील तीन ठिकाणी नव्याने पादचारी पूल उभारणार आहेत. यामध्ये आत्माराम पाटील चौक येथे पारसिक चौपाटीसमोर, विटावा आणि ठाणे-भिवंडी बाह्यवळण रस्त्यावर ते बांधणार आहे. यासंदर्भातील तीन वेगवेगळे प्रस्ताव २० जुलैच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहेत.ठाणे महापालिकेने जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील आत्माराम पाटील चौकापासून मुंब्रा बाह्यवळण रस्त्यापर्यंतच्या खाडीकिनाऱ्यालगतची अतिक्रमणे हटवली असून त्याठिकाणी चौपाटीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या पश्चिमेस नियोजित चौपाटीचे असून पूर्वेस नागरी वस्ती आहे. हा रस्ता मुंब्रा बाह्यवळण रस्त्यास जोडलेला असल्याने त्यावरून न्हावाशेवा बंदर तसेच तळोजा औद्योगिक, पनवेल, पुण्याकडे जाणाºया अवजड वाहनांची सतत येथे वर्दळ असते. त्यामुळेच आता या ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. तो आत्माराम पाटील चौक येथे ५८.२० मी. लांबीचा व ३.५० मी. रुंदीचा पादचारी पूल बांधला जाणार आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पदपथांवर प्रत्येकी एक याप्रमाणे २ मी. रुंद, ५२ मी. लांबीचा एक रॅम्प व चौपाटीकडील सेवारस्त्यावरील पदपथावरील २ मी. रुंद व ५२ मी. लांबीचा एक रॅम्प कळवा बाजूकडील सेवारस्त्यावरील पदपथावर जिना बांधणे तसेच चौपाटीच्या बाजूस नागरिकांना विहंगम दृश्य पाहण्यासाठी प्रॉमेनड (नागरिकांना बसण्याची जागा) बांधले जाणार आहे. या कामासाठी १० कोटी दोन लाख ९८ हजार ८०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे-भिवंडी बाह्यवळण रस्त्यावर लोढा कॉम्प्लेक्सजवळ १५० मी. लांबीचा व ३.५० मी रुंदीचा दुसरा पूल असणार आहे. तसेच मुख्य रस्त्यावर दोन व मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणाºया सेवारस्त्यावर प्रत्येकी एक याप्रमाणे चार रॅम्प बांधले जाणार आहेत. यासाठी २० कोटी ९६ लाख ८५ हजार १०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तिसरा पादचारी पूल ठाणे-बेलापूर रस्त्यावरील विटावा येथे उभारण्यात येणार आहे. येथे सकाळपासून रात्रीपर्यंत हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्ता क्रॉस करणे नागरिकांना कठीण होते.
ठामपा बांधणार तीन पादचारी पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 2:37 AM