ठाणे: मुंबई, ठाणे परिसरात चरसची विक्री करणा-या समीर आलम महंमद शेख (२२, रा. जुहू गाव, नवी मुंबई), व्यंकट काळे (२२, रा. महापे गाव, नवी मुंबई) आणि अस्लम रियाजुद्दीन अन्सारी (३४, रा. नवी मुंबई) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि युनिट एक यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आठ लाख ५३ हजारांंचे चार किलो चरस हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी मंगळवारी दिली.ऐरोली नवी मुंबई कडून कळवा मार्गाकडे रस्त्यावरुन दोघेजण चरस हा अमली पदार्थ विक्र ी करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना ८ जून रोजी मिळाली होती. याच माहितीच्या आधारे युनिट एक आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली कळवा रोडवरील एसटी वर्कशॉप येथे सापळा लावला. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या समीर शेख आणि व्यंकट काळे या दोघा संशयितांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने ताब्यात घेतले. या दोघांच्याही अंगझडतीमध्ये त्यांच्या जवळील दुचाकीमध्ये प्रत्येकी दोन असा एकूण चार किलो चरस हस्तगत केला. त्यांना अटक करीत त्यांच्याकडील चरस, दुचाकी, मोबाईल फोन असा आठ लाख ५३ हजार १५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे देवराज यांनी सांगितले. नवी मुंबई येथील खैरणेगाव येथील अस्लम अन्सारी याने हा चरस पुरवठा केल्याचे दोघांच्याही चौकशीत समोर आले. ही माहिती समोर आल्यानंतर अन्सारी यालाही अटक करण्यात आली. तिघांनाही १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे, मुंबई परिसरात चरसची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक: चार किलो चरस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 7:47 PM
नवी मुंबईतून ठाण्यात मोटारसायकलीवरुन चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या समीर शेख याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई आठ लाख ५३ हजारांचा ऐवज जप्तऐरोलीच्या एसटी वर्कशॉप येथे सापळा लावून केली कारवाई