कल्याण : गुटखा वाहतुकीची खोटी केस न करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हरीश कांबळे (३४), पोलीस हवालदार अंकुश नरवणे (५७) आणि पोलीस नाईक भरत खाडे (४९) या तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
तक्रारदारावर गुटखा वाहतुकीची खोटी केस न करण्यासाठी कांबळे, नरवणे आणि खाडे यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी एक लाख रुपये या तिघांनी पूर्वीच स्वीकारले होते. त्यानंतर, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यानंतर विभागाने सापळा लावला. त्यात उर्वरित ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना तिघांना पश्चिमेतील वालधुनी पोलीस चौकी येथे मंगळवारी रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, तिघांना बुधवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.