मीरा रोड : मीरा रोड पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना नशेत बेधुंद असणाऱ्या दोन महिलांसह एकूण १४ जणांनी दमदाटी, शिवीगाळ करत डांबून ठेवले व मारहाण केली. इतकेच नव्हे तर एका पोलिसाचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा मोठा ताफा गेल्यावर त्या तिघा पोलिसांची सुटका करून या नशेबाजांना अटक करण्यात आली. आरोपी २१ ते ३८ या वयोगटातील आहेत. आरोपींना ठाणे न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मीरा रोडच्या पूनम गार्डन भागात समृद्धी गृहसंकुल आहे. उच्च मध्यमवर्गीयांच्या या संकुलात ६०३ व ६०४ या सदनिका ही मदन मोहन सिंग यांच्या मालकीची आहे. सिंग हे बाहेरगावी असल्याने याच संकुलात सिंग यांची मुलगी शिप्रा (२८) ही पती चिराग त्रिवेदी (३१) व दीर उज्वल त्रिवेदी (२६) सह राहते. सिंग नसल्याने त्यांच्या घरात शिप्रा - चिराग यांनी पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी समृद्धी गृहसंकुलातील वृषभ बरवालिया (२९) , रेखा पिंपलकर (३८) मीरा रोडच्या शांतीनगर भागात राहणारे श्रीयांश शहा (२१), तन्मय राणे (२५), दीपेश गोहिल (२६), राहुल परु ळेकर (२६), अजय सिंग (२६), निखिल मस्कारिया (३५) तर राजवीर केजीरन पीटर मिनिजोस (२६) कृष्णा अग्रवाल (२१) रिकी कोटी (२९) हे मध्यरात्रीच्या सुमारास सदनिकेत आले होते.सोमवारच्या मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत या सर्वांचा सदनिकेत धिंगाणा सुरू होता. मोठ्याने संगीत लावणे, आरडाओरडा व नाच आदी प्रकाराने परिसरातील रहिवाशीही त्रासले. अखेर एका रहिवाशाने थेट ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात तक्र ार केली. मीरा रोड पोलिसांना तक्र ार मिळताच पोलीस शिपाई हरिश्चंद्र झांजे व प्रदीप गोरे हे इमारतीच्या रखवालदारास घेऊन सदनिकेत गेले. आतून दार उघडले असता मद्यधुंद अवस्थेतील तरूणांचा धिंगाणा सुरू होता. पोलिसांनी आवाज बंद करा असे सांगताच नशेत बेभान असलेल्यांनी पोलिसांशी अरेरावी करत धमक्या देण्यास सुरूवात केली. दोघा पोलिसांना आत ओढून खोलीत डांबत त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. एका पोलिसाचा मोबाइल काढला. त्यावेळी पोहचलेले पोलीस शिपाई प्रमोद केंद्रे यांनाही शिवीगाळ, मारहाण केली. एका पोलिसाची पॅन्ट खेचून काढण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद असलेल्या तरु णी पोलिसांना मारा असे ओरडत होत्या.हा सर्व प्रकार सुरू झाला तेव्हा समोरच्या सदनिकेत राहणाºया शेजाºयांनीही या टोळक्यास समजावण्याचा प्रयत्न केला. पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गोंधळ वाढल्याने शेजारचे धावून आले. दरम्यान, या तरूणांच्या कचाट्यात सापडलेल्या तिघा पोलिसांपैकी केंद्रे यांनी कसाबसा मीरा रोडचे वरिष्ठ निरीक्षक वसंत लब्दे यांना फोन करून मदतीसाठी येण्याची विनंती केली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लब्दे यांनी लागलीच पोलिसांना मदतीसाठी येण्यास सांगितले. अधिकाºयांसह पोलिसांचा फौजफाटा आल्यानंतर अखेर या टोळक्याच्या तावडीत सापडलेल्या तिघाही पोलिसांची सुटका केली.१२ पुरु ष व दोन महिलांची वैद्यकीय तपासणी केली. उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी सदनिकेची पाहणी केली असता आतमध्ये मद्याच्या बाटल्या व मद्याने भरलेले तर काही रिकामे ग्लास , हुक्का आढळला. या ठिकाणी अमलीपदार्थांचे सेवन केले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या आरोपींसाठी भाजपाचे चार नगरसेवक व एका स्थानिक नेत्याचा निकटवर्तीय पोलीस ठाण्यात आले होते. पण पोलिसांना डांबून ठेवत मारहाण केल्याचे समजल्यावर ते आल्या पावली माघारी फिरले.>गृहसंकुलाच्या वहीत नोंदच नाहीपोलिसांना मारहाण करणारे उच्चशिक्षति आहेत. काहींचा व्यवसाय आहे तर काही नोकरी करतात. यात एक जण महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. शिप्रा ही सीए आहे . तर रिकी कोटी हा स्वत:ला एबस्युलेट इंडियाचा पत्रकार म्हणवतो.दर दोन महिन्यांनी पार्टी होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पण भीतीपोटी सगळे गप्प बसतात. पार्टीसाठी आलेल्यांनी संकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नोंदवहीत बाहेरून आल्याची नोंद केली नसल्याचे येथील सूत्रांनी सांगितले.
तीन पोलिसांना मारहाण, मद्यधुंद अवस्थेतील १४ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 6:01 AM