ठाणे: शस्त्रांच्या धाकावर नाशिक-मुंबई महामार्गावर दरोडा टाकून पसार झालेल्या जकाउल्हा बताउल्हा चौधरी (२३, रा. मैनी, उत्तरप्रदेश ) याच्यासह तीन दरोडेखोरांना ठाण्याच्या कळवा पोलिसांनी थेट उत्तरप्रदेशात जाऊन अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त विलास शिंदे यांनी बुधवारी दिली. चौथा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु असून पाचव्या फरारी आरोपीचाही शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपींकडून तीन एअर पिस्टल, ६३ हजारांची रोकड आणि एक मोटारकार असा सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ १६ जानेवारी २०२३ रोजी एका मोटारकारमधून आलेल्या सशस्त्र टोळक्याने एका मोटारसायकलस्वाराला अडवून त्याच्याकडील पैशांची बॅग खेचून दोन लाख ५० हजारांची रोकड आणि तीन मोबाईल जबरीने चोरी केली होती. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. हा गंभीर गुन्हा उघड करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक दीपक घुगे आदींच्या पथकाने घटनास्थळावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीतीच्या आधारे यातील संशयीत आरोपींची माहिती मिळवली. दरोडयाच्या या प्रकारानंतर हे टोळके नाशिक- गुजरात-मध्यप्रदेश असा प्रवास उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्हयात भूमीगत झाले होते. यात पाच जणांच्या टोळक्याचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली.
टोळक्याने लुटीसाठी पिस्टलचाही वापर केल्याने त्यांना पकडण्यासाठी कळवा पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात गेले. तेथील बस्ती जिल्हयातून २४ जानेवारी २०२३ रोजी टोळीतील जकाउल्हा याच्यासह सोहेल शेख (२०) आणि अली उल्हा खान (१९) या तिघांना अटक केली. तर १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला बालन्यायालयाच्या परवानगीने नंतर ठाण्यात आणले जाणार आहे. सखोल चौकशीमध्ये त्यांनी या दरोडयाची कबूली दिली. त्यांच्याकडून दरोडयासाठी वापरलेल्या तीन एअर पिस्टल, लुटीतील रक्कमेपैकी ६३ हजार ५०० रुपये, दोन मोबाइल आणि एक मोटारकारही जप्त केली. त्यांनी ऑनलाईन एका अॅपवरुन पुण्यातील एका व्यक्तीच्या कारचा या दरोडयासाठी वापर केल्याचे उघड झाले. उपनिरीक्षक दिपक घुगे यांच्या पथकाने ही गुन्हे उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आरोपींना २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने बजावले आहेत.