ठाणे : ठाणे शहर पोलिस दलामध्ये ६८६ जागांसाठी गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मैदानी आणि शारीरिक चाचणीनंतर रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. याच परीक्षेमध्ये मोबाइलमधून कॉपी करणाऱ्या जालन्यातील दोघांवर आणि छत्रपती संभाजीनगरमधील एकावर, अशा तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध वर्तकनगर आणि वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे ग्रामीण पोलिस दलात एका पोलिस हवालदाराच्या मुलाला लेखी परीक्षेमध्ये मदत करताना आढळल्यामुळे पर्यवेक्षक असलेल्या पोलिस उपनिरीक्षकासह चौघांवर निलंबनाची कारवाई ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी नुकतीच केली आहे. त्यापाठाेपाठ ठाणे शहर पोलिस दलासाठीच्या रिक्त जागांसाठी ठाण्यातील २३ शाळांमध्ये १८ ऑगस्ट २०२४ रोजी सुमारे नऊ हजार उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. सावरकरनगर भागातील श्रीमती इंदिरा गांधी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर मोबाइलच्या माईक स्पाय इअर पीससह जीएसएम मायक्रो बॉक्सद्वारे परीक्षेत आलेले प्रश्न बाहेरील साथीदारांना सांगून त्याची उत्तरे पेपर सोडविताना जालना जिल्ह्यातील आनंदसिंह दुलत (२०) आणि छत्रपती संभाजीनगरातील युवराज रजपूत (२२) हे आढळले. हे निदर्शनास आल्यानंतर चितळसर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुधीर साठे यांनी त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह महाराष्ट्र विद्यापीठ व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
असाच प्रकार ज्ञानसाधना महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर जालना जिल्ह्यातील अर्जुन सुंदर्डे (२२) या उमेदवाराने केल्याचे आढळले. त्यानेही ब्ल्यूटूथ इअर पीस या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मांडीला चिकटपट्टी लावून परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या नातेवाइकाशी संगनमत करून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश केल्याचे आढळल्याने अर्जुन याच्याविरुद्धही वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राहुल पवार यांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.