ठाणे : मुंब्रा-शीळफाटा येथील मुंब्रा-पनवेल रोडवर असलेल्या बाजूबाजूच्या तीन दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही आग तासाभरात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी मेडिकल, डेकोरेट आणि चिकन शॉप या तीन दुकानांचे नुकसान झाले आहे. मात्र नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
मुंब्रा-पनवेल रोड लगत असलेल्या तीन दुकानांना सकाळी 08 वाजण्याच्या दरम्यान आग लागली असल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेल्या त्या आगीवर नऊ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत मेडिकल दुकानातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, बारकोड मशीन, फ्रिजर, पंखे, औषधांचा साठा व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे.
डेकोरेट क्लॉथेज कॅटलॉक, लाकडी सोफा सेट, शिलाई मशीन, पंखा, सॅम्पलसाठी ठेवण्यात आलेला कपडा व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे. तसेच चिकन दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग व साठा करून ठेलेला भुसा किरकोळ जळाला आहे. यावेळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह, ०१-हायराईज फायर वाहन पाचारण केले होते. तर, यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.