ठाणे : उल्हासनगर येथील मणप्पुरम गोल्ड लोन या दागिने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या संस्थेच्या वास्तूला भगदाड पाडून सुमारे ७ कोटी २२ लाख ४० हजार ३०५ रुपयांचे २८.६८६ किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या २० जणांच्या टोळीपैकी मुख्य सूत्रधारासह तिघांना थेट नवी मुंबईतून ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७७ लाख २७ हजार ५६२ रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मणप्पुरम गोल्ड लोन या संस्थेत २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. च्या दरम्यान दोन दिवसांची सुटी असल्याची संधी साधून कार्यालयाच्या पाठीमागील भिंत फोडून ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांसह रोकड लुटली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या ठाणे आणि उल्हासनगर युनिटकडे सोपविला होता. साहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने टोळीचा सूत्रधार कमरुद्दीन शेख (२८, तुर्भे, नवी मुंबई) आणि मनोज साऊद (३५, गणेशनगर, दिवा, ठाणे) यांना ४ जानेवारी रोजी अटक केली. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा आणखी एक साथीदार मुस्तफा उर्फ अख्तर समशेर (४४, रा. समस्तीपूर, झारखंड) यालाही तुर्भे भागातून उल्हासनगर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे, निरीक्षक अजय कांबळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख, उपनिरीक्षक उदय साळवी आदींच्या पथकाने सापळा रचून अटक केली. कमरुद्दीन हा या टोळीचा म्होरक्या असून त्यानेच या चोरीची आखणी केल्याचे तपासात उघड झाले. मुस्तफा आणि मनोज यांच्याकडून सुमारे दोन किलो ८६२.०६ ग्रॅम वजनाचे ७७ लाख २७ हजार ५६२ किमतीचे सोने हस्तगत केले आहे. यातील कमरुद्दीन आणि मनोजला १२ जानेवारीपर्यंत तर मुस्तफाला १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
उल्हासनगरच्या ‘मणप्पुरम्’ लुटीतील तीन चोरटे जेरबंद
By admin | Published: January 11, 2017 4:56 AM