मीरारोड - मीरा - भाईंदर मधील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी भीमसेन जोशी कोरोना रुग्णालयात आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सह भाजपा आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आदींची एकच गर्दी होऊन कोरोना रुग्णालयातच सोशल डिस्टनसिंग चे तीनतेरा वाजवण्यात आले .
भाईंदरच्या कोरोना रुग्णालयात आज सोमवारी फडणवीस आणि दरेकर येणार म्हणून स्थानिक भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आदींनी एकच गर्दी केली होती. फडणवीस, दरेकर सह आमदार रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी महापौर डिंपल मेहता, सभापती अशोक तिवारी, सभागृह नेते रोहिदास पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे सह भाजपाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनी रुग्णालयात सोशल डिस्टंसिंग न पाळता एकच गर्दी केली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांसह काही पत्रकार नसलेल्यानी पण घोळका केला. रुग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या बैठक सभागृहात जाण्यासाठी सुद्धा रेटारेटी झाली.
कोरोना रुग्णालयातून निघालेला ताफा हा नंतर महापालिका मुख्यालयात शिरला . तेथे देखील सोशल डिस्टंसिंग ला हरताळ फासण्यात आला . दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सुद्धा पालिकेचे पदाधिकारी नसलेले देखील जमले होते . बैठक आटोपून तळमजल्यावर येताना सुद्धा गर्दी होती . तळमजल्यावरील येण्या जाण्याच्या मार्गताच टेबल टाकून पत्रकार परिषद घेण्यात आली . तेथे देखील सोशल डिस्टनसिंगचा धुरळा उडवण्यात आला . बाहेर जाताना देखील घोळक्यानेच सर्व बाहेर गेले .
वास्तविक कोरोना रुग्णालयात बैठक घेण्याची आणि गर्दी करण्याची गरज होती का ? पण तेथे झालेली गर्दी आणि त्या नंतर महापालिका मुख्यालयातील गर्दी पाहून नागरिकांनी या वर टीकेची झोड उठवली आहे . सर्वसामान्य नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळा म्हणून तत्वज्ञान शिकवणाऱ्यानी आणि नेते मंडळी व नगरसेवकांनी आधी सोशल डिस्टंसिंग पाळावे . हेच सामान्य नागरिक असते तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दंड वसूल केला असता असे माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी सांगितले.