ठाणे : ठाणे परिवहनसेवेत बदली व रोजंदारीवर काम करणारे ६१३ चालक आणि वाहक अखेर सेवेत कायम झाले आहेत. शुक्रवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांच्या या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. विशेष म्हणजे २००० सालापासूनचे कायम सेवेचे फायदे त्यांना मिळणार आहेत.ठाणे परिवहनची सेवा १९८९ मध्ये सुरू झाली. त्यानंतर, १९९५ ते २००० या कालावधीत परिवहन समिती व महासभेने मंजूर पदांवर चालकवाहक या संवर्गात बदली-रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या कामगारांनी सेवेतील २४० दिवस भरले असतील, तर त्यांना कायम केले जाते. परंतु, ठाणे परिवहनसेवेमार्फत तशी कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे टीएमटी एम्प्लॉइज युनियन या कामगारांच्या हक्कासाठी औद्योगिक न्यायालयात गेली होती. त्यानुसार, या कामगारांना सेवेत हजर झाल्याच्या दिनांकापासून त्यांना २४० दिवस ज्या दिवशी पूर्ण होत आहेत, त्या दिनांकापासून कायम कर्मचाºयांप्रमाणे फायदे देण्यात यावेत, असा निर्णय देण्यात आला होता. या निर्णयाविरोधात ठाणे महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयानेसुद्धा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.>कामगारांत आनंदयानंतर, युनियनच्या माध्यमातून वारंवार आयुक्तांकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता. तसेच याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेतसुद्धा बैठक झाली होती.त्यानंतर, काही महिन्यांपूर्वी शिंदे आणि आयुक्त जयस्वाल यांच्यात झालेल्या बैठकीत या कामगारांना सेवेत कायम करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, आता ६१३ कर्मचारी सेवेत कायम झाले आहेत. परंतु, यातील काही कर्मचारी मयत, तर काहींनी सेवेतून काढता पाय घेतला आहे.दरम्यान, २७-०९-२००५ पासून सेवानिवृत्तीसाठी अर्हताकारी सेवा व अनुषंगिक फायदे देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, युनियनने हे फायदे २००० सालापासून मिळावेत, अशी मागणी लावून धरली होती. ती सुद्धा अखेर मान्य करण्यात आल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.
परिवहनचे ६१३ कर्मचारी अखेर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:20 AM