भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्युअंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीसभिवंडी : तालुक्यातील कांबे गावात पिलानी पाडा येथे रहाणा-या आदिवासी कुटूंबातील तीन मुली आंघोळीस गेल्या असता खदानीच्या डबक्यातील पाण्यात बुडून मरण पावल्या.ही घटना घडल्यानंतर शोकाकुल झालेल्या कुटूंबीयांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने परिसरांत संताप व्यक्त केला जात आहे.निता चैत्या फकाट(१४) ,रोहिता रवी मांगात(१३) व रसिका रवी मंगात(१२) असे तीन बुडालेल्या मुलींची नांवे असून निता फकाट ही रोहिता व रसिका या दोन मुलींची मावशी आहे. त्यापैकी निताने शाळेत जाण्याचे सोडले होते. तर रोहिता व रसिका या दोन्ही बहिणी खोणी गावातील मराठी विद्यालयांत ७वीत शिकत होत्या.त्यांच्या परिक्षा झाल्याने त्यांना सुट्टी लागली होती. घरांतील कुटूंब मोलमजूरीस गेले असता त्या तिघी सोमवारी दुपारच्या वेळेस आपल्याच शेतातील खदानीच्या डबक्यात साचलेल्या पाण्यात आंघोळीस गेल्या होत्या. त्यावेळी डबक्यातीलखोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यामधील एक मुलगी खड्ड्यातील पाण्यात बुडायला लागली.तेंव्हा एकमेकींना वाचविताना तीघीजणी पाण्यात पडून बुडाल्या. ही घटना तेथे खेळत असलेल्या लहान मुलांनी पाहिली आणि त्यांना वाचविण्याच्या हेतूने मुलींच्या घरी जाऊन झालेली घटना सांगीतली. तेंव्हा गावातील मुलांनी त्या तिघींना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारून तिघींना पाण्याबाहेर काढले. परंतू तो पर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. ही घटना झाल्यानंतर परिसरांतील आदिवासींनी मिळून त्यांच्या मृतदेहावर सोमवारी रात्री ८ वाजता अंत्यसंस्कार केले. त्यानंतर ही घटना निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना समजली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र ही घटना होऊन चोवीस तास उलटून झाल्यानंतरही पोलीस ठाण्याच्या डायरीत मुलींच्या बुडून मृत्यु पावल्याची नोंद केलेली नव्हती.तसेच कांबा गावातील पोलीस पाटलाने देखील याबाबत पोलीसांना महिती दिली नाही. त्यामुळे परिसरांत पोलीसांच्या कार्यपध्दतीबाबत संताप व्यक्त केला जात आहे.