ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य नगर, वागळे इस्टेट भाग हा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला नंतर आता माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील मानपाडा, आझादनगर आणि मनोरमा नगर हे भाग पुढील पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.यापूर्वी लोकमान्य नगर, वागळे इस्टेट येथील अनेक परिसर पालिकेने कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव डोळ्यासमोर ठेवून अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये देखील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. या प्रभाग समितीमध्ये आजच्या घडीला ६८ च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची भिती असल्याने महापालिकेने २१ मेच्या मध्यरात्री १२.०१ वाजेपासून ते २६ जानेवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत येथील सर्वच अत्यावश्यक सेवांसह सर्वच व्यवहार येथील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील मानपाडा, आझादनगर आणि मनोरमा नगर हे अत्यंत दाटीवटीचे आणि गर्दीचे भाग आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टेसिंगचे पालन होत नसल्याचेही पालिकेच्या निर्दशनास आले आहे. नागरीकांना वारंवार सांगूनही त्यांच्याकडून चुका होतांना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पालिकेने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत या संपूर्ण भागात पोलीसांकरवी बंदोबस्त ठेवण्याची मागणीही सहाय्यक आयुक्तांनी पोलिसांकडे केली आहे. त्या अनुषगांने या पाच दिवसांच्या कालावधीत या तीनही भागांमध्ये पोलिसांचे राऊंड तर होणार आहेतच शिवाय जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.दरम्यान या पाच दिवसांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांची दुकानेही बंद ठेवण्यात येणार असून मास, मटण, बेकरी, भाजीपाला देखील बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुध, भाजीपाला, फळे, बेकरी, मासळी इतर जीवनाश्यक वस्तु या घरपोच दिल्या जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. तर अन्नधान्य किराणा, दुकाने, दुध, डेअरी औषधांची दुकाने ही सोशल डिस्टेंसिगचे पालन करुन सुरु राहतील असेही पालिकेने सांगितले आहे.
माजिवडा मानपाडा भागातील तीन प्रभाग पाच दिवस बंद कोरोनाच्या वाढत्या संख्येनुसार पालिकेने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 5:19 PM