- जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळून पळालेला न्यायालयीन बंदी नरेश छाब्रिया (२९, रा. साईनाथ कॉलनी, उल्हासनगर) हा आरोपी पसार झाल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करूनही तो अद्याप ठाणे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला शोधण्यासाठी बुधवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीदरम्यान पुन्हा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे विशेष मकोका न्यायालयात १६ जुलै २०१९ रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास सुनावणीसाठी नरेशला नेण्यात आले होते. या सुनावणीनंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडे त्याच्यासह अन्य चार आरोपींना नेले जात असतानाच कैदी पार्टीवरील मुख्यालयाचे जमादार शिवराम चव्हाण यांच्या हाताला झटका देऊन तो पसार झाला होता. त्यावेळी कारागृहासमोर झालेल्या वाहतूककोंडीचाच फायदा घेऊन तो एका दुचाकीस्वारामागे बसून निसटला होता. त्यावेळी इतर कैदीही असल्यामुळे चव्हाण यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना त्याचा पाठलाग करता आला नाही. तर, चव्हाण यांनी पाठलाग करूनही तो त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटला होता. त्याच्या शोधासाठी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे शोध पथक (डीबी), उल्हासनगरचे हिललाइन, भिवंडीचे शांतीनगर तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट १ ठाणे शहर, युनिट २ भिवंडी आणि युनिट ३ कल्याण अशा सहा पथकांची निर्मिती केली आहे. सहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह त्यांची पथके त्याच्या मागावर आहेत. चोरी, दरोडा तसेच मकोकांतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. एका गुन्ह्यात वारंवार समन्स बजावूनही तो हजर होत नव्हता. २६ जून २०१९ रोजी अटक वॉरंट काढल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. नरेश छाब्रियाच्या घटनेपाठोपाठ कल्याणमधूनही एक आरोपी पसार झाला होता. त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. उल्हासनगर येथील कुटुंबीयांकडेही नरेश परतलेला नाही. त्याची अनेक ठिकाणी चौकशी करूनही तो हाती न लागल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात गेल्या महिनाभरातील गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त फणसळकर यांनी बुधवारी घेतला. गेल्या महिनाभरात ज्या पोलिसांनी चांगली कामगिरी केली, त्यांचा प्रमाणपत्र देऊन आयुक्तांनी सन्मान केला. आगामी बकरी ईद, स्वातंत्र्य दिन, नारळी पौर्णिमा आणि गणेशोत्सव या सणांसाठी चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.
तीन आठवडे उलटूनही ठाण्यातून पसार झालेल्या कैद्याची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:28 AM