लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात डल्ला मारणाºया साजादा उर्फ अंनु बशीर अन्सारी (३०), नाजिया इजराइल शेख (३०) आणि नसरिन बशीर शेख (५०) या तीन महिलांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून दोन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.जांभळी नाका येथील ‘सोळंकी ज्वेलर्स’ या दुकानात ३० सप्टेंबर २०२० रोजी मालेगाव इस्लामपूर येथील झोपडपट्टीत राहणाºया नसरीन हिच्यासह तीन महिला बुरखा परिधान करून सोन्याचा नेकलेस खरेदीसाठी आल्या होत्या. दरम्यान, दुकानाचे मालक राजेंद्र सोळंकी यांनी त्यांना सहा नेकलेस दाखविले. मात्र, नेकलेस पसंत न करताच त्या दुकानाबाहेर पडल्या. दरम्यान, त्या सहापैकी एक नेकलेस चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोळंकी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन भारते, पोलीस हवालदार गणेश पोळ, पोलीस नाईक विक्रम शिंदे, तानाजी अंबुरे, कॉन्स्टेबल उमेश मुंडे आणि रोहन पोतदार आदींच्या पथकाने आजूबाजूच्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्या महिलांनी वापरलेल्या रिक्षाचा शोध घेतला. त्यांनी जेल तलाव येथून ती रिक्षा पकडल्याचे उघड झाले. रिक्षात बसण्यापूर्वी त्यांच्यापैकी एकीने तिथून फोन केला होता. हाच धागा पकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पथकाने त्यांचा माग काढला. तेंव्हा अशाच एका गुन्हयात भायखळा पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली. या सर्व पुराव्यांच्या आधारावर त्यांना १० आॅक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले. ठाण्यातील चोरीचीही त्यांनी अखेर कबूली दिली. त्यांच्याकडून दोन तोळयांचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्यांना २४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.