ठाणे : कळवा परिसरात तीन दिवसांत तीन महिलांच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून चोरट्यांनी पलायन केल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तीन जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेत पारसिकवाडी, इंदिरानगर येथे राहणारी १८ वर्षीय तरुणी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ७.२५ वाजण्याच्या सुमारास मफतलाल तलावासमोरून मोबाइलवर बोलत पायी जात होती. त्याच वेळी तिथे आलेल्या एका चोरट्याने तिच्या हातातील मोबाइल खेचून पलायन केले. दुसरी घटना कळवा इंदिरानगर भागात घडली. २६ फेब्रुवारी रोजी ३२ वर्षीय महिला रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर येथून पायी जात असताना तिच्या हातातील सात हजारांचा मोबाइल एका चोरट्याने जबरीने हिसकावून पलायन केले. तिसऱ्या घटनेत खारेगाव भागात राहणारी २५ वर्षीय महिला २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मफतलाल तलावासमोरून मोबाइलवर बोलत जात होती. त्याच वेळी एका अनोळखी चोरट्याने तिच्या हातातील १८ हजारांचा मोबाइल हिसकावून पलायन केले. या तिन्ही घटनांबाबत जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल केल्याची माहिती मंगळवारी कळवा पोलिसांनी दिली.