पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रामध्ये जमिनीत पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून तिघा कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ठेकेदाराने कामात दुर्लक्ष पणा केल्यामुळे तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. टाकीचे काम करीत असताना त्या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावण्यात आला होता. अचानक हा पंप बंद पडल्याने सहा कामगार तो पंप पुन्हा सुरू करण्यासाठी गेले होते. त्यातील तिघा कामगारांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला. पंप बंद असला तरी पंपाला असलेला विजेचा पुरवठा सुरूच ठेवल्याने या पंपाला शॉक लागून तिघा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या ठिकाणी असलेला एक कामगार गंभीर जखमी झाला. उर्वरित दोघा कामगारांनी पळ काढल्याने त्यांचा जीव बचावला आहे. मृत कामगारांमध्ये शालिग्राम मंडल (१८), गुलशन मंडल (१८) आणि राजन मंडल(१९) यांचा समावेश आहे.
- बारवी नदीतून पाणी उचलून ते पाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पुरवठा करण्यासाठी नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.
- जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नव्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
- जलशुद्धीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरवली न गेल्यामुळेच त्यांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.