ठाणे : जन्मत:च नाकाला छिद्र असल्याने सुंदरता हरवलेल्या एका चिमुरडीला पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रयत्न करून तिची सुंदरता मिळवून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा एका कर्णबधीर चिमुरड्याला वाणी आणि आवाजाच्या संवेदना मिळवून देऊन एका आगळ्यावेगळ्या सामाजिक परंपरेला जन्म दिला आहे. पालिका आयुक्तानी ठाण्यातील सर्वच रु ग्णालयात जन्माला येणाऱ्या अर्भकांची हेअरिंग स्क्रिनींग करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्या संदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजूर करुन घेतला. अशी तपासणी करणारी ठाणे ही देशातली पहिली महापालिका ठरणार आहे. खाजगी कंपनीत कार्यरत असलेले चंद्रकांत कुंभारे त्यांची पत्नी कोमल आणि ३ वर्षीय आदर्श असा परिवार आहे. लहानपणापासूनच तो कर्णबधीर होता. त्याला बोलता यावे म्हणून कुंभारे कुटुबियांनी अनेक दवाखाने पालथे घातले. परंतु, त्यांना काहीच मार्ग सापडत नव्हता. खूप वणवण केल्यानंतर त्यांना ठाण्याच्या पाचपाखाडीतील डॉ. प्रदीप उप्पल यांच्या दवाखान्याची माहिती मिळाली. त्यानुसार कुंभारे दाम्पत्य आशेपोटी यांच्या दवाखान्यात गेले. तपासण्या आणि त्यानंतर काँप्लेर इंप्लांट सर्जरी करावी लागणार असल्याचे उप्पल यांनी सांगितले. यासाठी ८ लाखाचा खर्च येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. परंतु, घरची तेवढी परिस्थिती नसल्याने मुलावर उपचार कसे करायचे असा पेच त्यांच्यापुढे होता. त्यामुळे ते हताश झाले होते. परंतु, डॉ. उप्पल यांना कुंभारे दाम्पत्याची परिस्थिती समजली. कुंभारे यांना धीर देऊन पालिकेच्या योजनेची माहिती देऊन आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घ्या असे सांगितले. त्यानुसार पालिका आयुक्तांच्या ही बाब निदर्शनास येताच, त्यांनी पालिका आणि खाजगी संस्थेमार्फत साडेतीन लाखाच्या खर्चाची व्यवस्था केली. उर्वरित अन्य सेवाभावी संस्थांकडून घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सुरवातीला आठ लाखांचा खर्च ऐकून गाळून गेलेल्या कुंभारे दाम्पत्याच्या जिवात जीव आला. आयुक्तांच्या आश्वासनावर डॉ. उप्पल यांनी तयारी केली आणि यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पाडली. त्यानंतर आता आदर्शच्या आयुष्यावर लागलेला मुक-बधीरतेचा कलंक आयुक्त जयस्वाल आणि डॉ. उप्पल यांनी धुवून काढला. आर्थिक चणचण यामुळे चिमुरड्या आदर्शच्या शस्त्रक्रिया होत नव्हती. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महापौर आणि डॉ. उप्पल हे नशिबाने भेटले आणि आमच्या कर्ण बधिर आदर्शच्या जीवनाचा नवा सूर्य उगविला. त्याला नवे सुंदर आणि सक्षम जीवनदान दिले. त्यामुळे आमच्या मुलाच्या तोंडून आम्ही ‘मम्मी’ अशी हाक मारल्याची प्रतिक्रिया कुंभारे दामप्त्याने दिली. (प्रतिनिधी)
अन तीन वर्षाचा आदर्श ‘मम्मी’ म्हणाला
By admin | Published: October 05, 2016 2:31 AM