सदानंद नाईक ।उल्हासनगर : आमदार ज्योती कलानी यांची शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यास पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी दिला आहे. पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना बाजूला सारण्याऐवजी पक्षनेतृत्व पाठीशी घालत असल्याची टीका गंगोत्री यांनी केली.उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिकार कलानी कुटुंबाकडे दिले होते. शहरात राष्ट्रवादी म्हणजे कलानी असे समीकरण झाले होते. मात्र, गेल्या पालिका निवडणुकीत ओमी कलानी यांनी त्याला तडा दिला. पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पक्षाची सूत्रे पडद्याआडून ओमी चालवत होते व ज्योती कलानी या नामधारी शहर जिल्हाध्यक्षा होत्या. ओमी यांनी आपली उमेदवारांची टीम पालिका निवडणुकीत उतरवून भाजपासोबत महाआघाडी केली. ओमी टीमचे नगरसेवक चक्क भाजपाच्या निशाणीवर लढले. गंगोत्री गट सोडून राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते ओमी यांच्यासोबत गेले.ज्योती आमदार असल्याने नावालाच शहराध्यक्ष राहिल्या असून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी पक्षासाठी काही काम केले नसल्याचा आरोप गंगोत्री यांनी केला. महापालिका प्रभाग क्र.-१७ च्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या सुमन सचदेव यांचा प्रचार न करता, ज्योती यांनी भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या साक्षी पमनानी यांचा प्रचार केला. पक्षाचे स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवानी यांनी बंडखोरी करून भाजपाच्या साक्षी पमनानी यांचा प्रचार केल्याबद्दल जेसवानी यांचा ज्योती यांनी सत्कार केला. ओमी उल्हासनगरात जे करतात, त्याला ज्योती यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही गंगोत्री यांनी केला.ज्योती यांच्या फेरनिवडीचे संकेत?राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्षपदाचे आपण मुख्य दावेदार असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल ज्योती कलानी यांच्यावर कारवाईची मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. नवी मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याने कलानी यांच्याकरिता मोर्चेबांधणी सुरू केल्याने कार्यकारिणीत नाराजी आहे. कलानी यांची फेरनिवड झाल्यास पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देतील, असे स्पष्ट संकेत गंगोत्री यांनी दिले.ओमी यांनी पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात नेऊन उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्वहीन केले. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला असून महापालिकेत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आणले. मात्र, पक्षविरोधी कारवाया करणाºया ज्योती कलानी यांची फेरनिवड केल्यास पक्षाचे शहरातील अस्तित्व संपून जाईल. ही बाब मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणली आहे. - भरत गंगोत्री, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून शहरातील समस्या विधानसभेत मांडण्याचे काम केले आहे. शहर विकास आराखड्यातील त्रुटी, जीन्स कारखान्यांचे प्रदूषण, प्लास्टिक पिशव्याबंदी, बेकायदा बांधकामे आदी प्रश्नांबाबत विधानसभेत आवाज उठवून, पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांचे हात बळकट केले असल्याने शहर जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेतील आपण मुख्य दावेदार आहोत.- ज्योती कलानी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:48 AM