ठाणे : अभिनय कट्ट्याच्या विक्रमी सलग ४१२ सादरीकरणानंतर गेल्या वर्षभरापासून अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांच्याच संकल्पनेतून 'संगीत कट्टा' सुरू करण्यात आला आणि बघता बघता शेकडो कलाकारांनी संगीत कट्ट्यावर गायन, वादन आणि नृत्याचे सादर केले.
सामान्य कलाकारांसारखे असामान्य अशा दिव्यांग कलाकारांच्या संगीतगुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने दिव्यांग कला केंद्र व समाज विकास विभाग ठा. म.पा यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत कट्ट्यावर दिव्यांग संगीत कट्ट्याची सुरुवात करण्यात आला आहे. सदर दिव्यांग संगीत कट्ट्याचे उदघाटन माननीय महापौर मिनाक्षी ताई शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के ह्यांच्या शुभहस्ते झाले.या प्रसंगी माजी महापौर प्रेमसिंग रजपूत आणि माजी नगरसेवक भास्कर पाटील उपस्थित होते. प्रत्येक महिन्याचा शेवटचा शुक्रवार हा दिव्यांग संगीत कलाकारांसाठी राखीव असणार आहे.ह्या शुक्रवारी ते आपले गीत आपले वादन आपले नृत्य सादर करू शकतात. दिव्यांग कलाकारांनी आपल्या धम्माल सादरीकरणाने पहिल्याच दिव्यांग संगीत कट्ट्याची धडाकेबाज सुरुवात केली. दिव्यांग कला केंद्राच्या विजय जोशी याने 'नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा', आरती गोडबोले हिने केशवा माधवा', ऋतुजा गांधी हिने 'टप टप टप टाकीत टापा', अपूर्वा दुर्गुळे हिने 'नाच रे मोरा',जान्हवी कदम हिने 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला', प्रशांत जगताप ह्याने 'केशवा माधवा' ह्या गीतांचे सादरीकरण केले.शशिकांत दाभोळकर ह्यांनी कराओके वर सादर केलेल्या 'मेरे मेहबूब' ह्या गीताने कार्यक्रमात रंगत आणली. प्रथमेश या अंध कॅसिओ वादकाने वाजवलेल्या गाण्यांनी श्रोत्यांची खास दाद मिळवली. संगीत कट्ट्याचे गायक सुरेश राजगुरू ह्यांनी 'रिमझिम गीरे सावन ' हे गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच ज्येष्ठ गायक विजय केळकर ह्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संगीत कट्ट्याचे वातावरण देशभकतीमय केले. अशाप्रकारे संगीत कट्टा क्रमांक ३५ वर पहिल्या विशेष दिव्यांग संगीत कट्ट्याची सुरुवात खरोखरच विशेष अशी झाली. सदर संगीत कट्ट्याचे निवेदन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी केली. कलाकृतीच्या सादरीकरणानंतर दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदातून मिळणारे समाधान हेच ह्या दिव्यांग संगीत कट्ट्याचे यश आहे असे मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.