ठाणे - तब्बल दोन वर्षाच्या प्रर्दिघ कालावधीनंतर जामीनावर बाहेर आलेले राष्ट्रवादीचेनेते छगन भुजबळ यांना राज्यस्तरीय ओबीसी जनगणना महापरिषदेच्या वतीने ओबीसी योध्दा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. येत्या ११ मे रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या ओबीसी जातनिहाय जनगणना अभियानाचा समारोपाच्या वेळेस दिला जाणार आहे. याच माध्यमातून छगन भुजबळ हे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
भुजबळ यांच्या सुटकेमुळे राज्यभर सुरु असलेल्या ओबीसी जनगणना अभियानाला बळ प्राप्त झाल्याची भावना आमदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे ठाण्यातील नेते दशरथ पाटील, ओमप्रकाश मौर्या, डी. के. माळी, प्रा. श्रावण देवरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. संविधानिक न्याय यात्राअंतर्गत राज्यस्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान ११ एप्रिल २०१८ रोजी पूणे येथून सुरु झाले.
देशातील भटके - विमुक्त जाती - जमाती, बलुतेदार, विश्वकर्मा, मुस्लीम अशा सर्व ओबीसी घटकातील जाती -जमातींची जातनिहाय जनगणना २०१२ च्या जनगणनेत करण्याची मुख्य मागणी या अभियानात करण्यात आली आहे. पश्मिच महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी जनगणना परिषदा घेण्यात येत आहेत. ११ मे रोजी हे जनगणना अभियान मुंबईत प्रवेश करणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता या अभियानाच्या समारोपाची जाहीर सभा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. याच ठिकाणी छगन भुजबळ यांना ओबीसी योध्या हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. यावेळी भुजबळ हे या माध्यमातून आपले जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान या सभेचे अध्यक्षपदच छगन भुजबळ यांच्याकडे असणार आहे. असा ठरा २२ एप्रिल रोजी परभणी येथील जनगणना अभियनाच्या बैठकीत एकमताने मंजुर झाला होता. याचाच अर्थ भुजबळ यांनी आधीपासूनच शक्तीप्रदर्शनाची तयारी केली होती, असा होत आहे. परंतु याची घोषणा आम्ही आधीच केली असल्याचे सांगत भुजबळ बाहेर आले नसते तरी अध्यक्षस्थानाची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली असती अशी माहिती यावेळी राठोड यांनी दिली. दरम्यान या परिषदेचा समारोपाचा शुभारंभ बाळासाहेब प्रकाश आंबेडकर करणार असून उत्तर प्रदेशचे गोरखपुर मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले खासदार प्रविणकुमार निषाद, हरियानाचे ओबीसी खासदार राजकुमार सैनी, मुस्लीम ओबीसी नेते आमदार हुसेन दलवाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.