अजित मांडके ठाणे: ठाणे महापालिका एकीकडे स्मार्ट सिटीचा गवगवा करीत असतांना दुसरीकडे मात्र पालिकेतील कर्मचारी, अधिका-यांचा पगार हा आजही मस्टरवर सही करूनच काढला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्मचारी आणि अधिकाºयांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने सुरुवातीला थम्ब मशिन लावली होती. मात्र, ही यंत्रणा अपयशी ठरल्यानंतर त्यावर उपाय म्हणून थेट फेस रीडिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पालिकेने वापर केला. परंतु मागील चार महिन्यापासून तीही बंद असल्याचे समोर आले आहे. यात हार्डवेअरचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला जात असला तरी प्रत्यक्षात या मशिनचा प्रयोगच सपशेल फसल्याचे दिसत आहे.ठाणे महापालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने एकेक पाऊल पुढे सरकत आहे. परंतु, फेस रीडिंग मशिनच्या उडालेल्या बाजारामुळे पालिका आजही किती अधोगतीकडे जात आहे, याची प्रचिती येत आहे. कर्मचाºयांना शिस्त लागावी, ते कामावर वेळेत हजर राहावेत, कामांचे तास त्यांनी पूर्णपणे भरावेत यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी थम्ब इम्प्रेशनचा फंडा पुढे आणला होता. यासाठी कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी केली. त्यानंतर या मशिन मुख्यालयासह, प्रभाग समिती कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसविल्या होत्या. परंतु, या नंतरही अधिकारी, कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारची शिस्त काही लागली नाही. तेव्हादेखील कर्मचारी, अधिकाºयांचा पगार हा हजेरी बुकवर सही करूनच काढला जात होता.एकूणच थम्ब मशिनच्या गाशा गुंडाळल्यानंतर दीड वर्षापूर्वी पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर फेस रीडिंगचा पर्याय पुढे आणला. त्यानुसार मुख्यालयासह प्रत्येक प्रभाग समिती कार्यालये मिळून १७ मशिन बसविल्या. प्रत्येक मशिनसाठी पालिकेने सुमारे ३५ हजारांचा खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली.यामुळे प्रत्येक कर्मचारी, अधिकारी वेळेत कामावर आला आहे का, या माहिती बरोबरच त्याचा चेहरा यामध्ये रीड केला जाणार असल्याने त्यांच्या कामात पारदर्शकता येणार असल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु,अवघ्या दीड वर्षातच पालिकेचा तो फोल ठरल्याची माहिती आहे. मागील चार महिन्यापासून या मशिनचा बाजार उडाला आहे.परंतु याची कर्मचारी अथवा अधिकाºयांना त्याची तोडीसुद्धा कल्पना नाही. कर्मचारी रोजच्या रोज कामावर येतांना आणि जाताना फेस रीडिंग करतात.त्यामुळे आपली हजेरी भरली जात असल्याचे त्यांना वाटत आहे. परंत, प्रत्यक्षात या मशिनचा करारनामा चार महिन्यापूर्वीच संपुष्टात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. हार्डवेअरचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून ही यंत्रणा बंद असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.>पालिकेचा मशिनवर भरवसा नाय काय...फेस रीडिंगची मशिन उपलब्ध असतांनाही पालिकेचा या मशिनवर भरवसाच नसल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. ती मागील चार महिन्यापासून बंद आहे. परंतु, असे असतांनादेखील कर्मचाºयांचा पगार हजेरी बुकवर सही केल्यानंतरच निघत आहे.कर्मचाºयांनी वेळेत कामावर यावे, यासाठी सुरुवातीला थम्ब आणि नंतर फेस रीडिंग मशिनची व्यवस्था पालिकेने केली होती. परंतु असे असतांनादेखील तिचा कोणत्याही प्रकारचा उपयोग अद्यापही झाला नसून हजेरी बुकवर सही करावी लागत असल्याने कभी भी आओ कभी भी जाओ, घर तुम्हाराही है असा कारभार पालिकेत आजही सुरू आहे.
फेस रीडिंग मशिनचा उडाला बोजवारा, हार्डवेअर अपडेट नाही, म्हणे ठाणे स्मार्ट सिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:54 AM