सुनिल घरत/ लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई तालुक्यातील शुध्द पाण्याच्या नावाखाली अशुध्द पाण्याचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. पाणी शुध्दीकरण करणाऱ्या प्रकल्पामध्ये फार्मासिस्ट मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळा नसल्याने तसेच शुद्धतेचे कोणतेही निकष तपासले जात नसल्याने मोठ्या रक्कमा आकारुन नागरिकांना अशुद्ध पाणी पाजले जात आहे.तालुक्यात कामण, सातीवली, धानीव, पेल्हार बावखळ, शिरसाड आदि ठिकाणी बाटलीबंद पाण्याचे कारखाने सक्रीय असून या कारखान्यात पाण्याची शुध्दता तपासण्याचे यंत्रच नाहीत. पाणी शुध्दतेसाठी १४ प्रक्रीया व २२ प्रकारच्या चाचण्या घेण्याचे नियम कारखान्याचे मालक पायदळी तुडवत आहेत. या बाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी पाणी प्रक्रिया उद्योगाकडे पाठ फिरवत असल्याने त्याला चांगलाच जोर चढला आहे. पाणी परीक्षणाचे निकष धाब्यावर : पाणी पिण्यायोग्य होण्यााठी ३२ प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये डीसल आॅक्सिजन हार्डलेस पी एच, ओडर, कलर, जिवाणुंची स्थिती, पाण्यातील जडपणा अशा प्रकारच्या चाचण्या पाणी प्रकल्पात करणे गरजेचे आहे. या प्रयोग शाळांमध्ये तंत्रज्ञ असणेही गरजेचे आहे. पाण्याती क्षार, विषाणू क्लोराईडसह, घातक द्रव्य बाजुला काढण्याचे तसेच स्वच्छता, पॅकिंग या संदर्भातील निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात नाहीत. हे करतांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाटलीची पॅकिंग चांगल्या दर्जाची करण्यात येत असून ग्राहक ही या आकर्षक पॅकिंगला भुलून हे बाटलीबंद पाणी विकत घेत आहेत. काही ठिकाणी तर बोअरवेल, नळाचे पाणी देखील बाटल्यांमध्ये भरून घरीच पॅकिंग करून विकण्यात येत आहे. शासना कडून नागरिकांच्या होणाऱ्या या लुटीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची व्यथा वसई स्थानकातील अनेक तरुणांनी केली आहे. नोकरी, व्यावसाया निमित्त निघलेल्या अनेकांना या पाठीमागे लागायला वेळ नसतो. तसेच केल्याल्या तक्रारीची पुढे फॉलोअप होत नसल्याचेही अनेकांनी सांगितले.बाटलीबंद अशुध्द पाणी विकणे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असून पाणी प्रकल्पात ५ रूपयांना मिळणारी १ लीटर पाण्याची बाटली दुकानात २० रूपयांना मिळत असल्याने पाण्याची शुध्दता तपासून विक्री किमतीवरही सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.- राम पाटील, सदस्य,ग्राहक संरक्षण परिषद पालघर जिल्हा
वसईत बाटलीबंद पाण्याच्या गोरखधंद्याला जोर
By admin | Published: June 03, 2017 6:07 AM