मुरलीधर भवार/प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/ डोंबिवली/ कल्याण : वादळी वारा आणि मुसळधार पावसाने ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि शहापुराला सोमवारी झोडपले. वादळी वाऱ्याचा वेग जोरदार असल्याने झाडे, होर्डिंग, वाहने पडण्याच्या तर कुठे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. शहरात काही परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
उल्हासनगरमध्ये सोमवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सुभाष टेकडी भागात दोन झाडे कोसळली. त्यापैकी एक झाड घरावर पडले. भिवंडीतील ग्रामीण भागात वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. शहापूर तालुक्यात बिरवाडी, भातसा, शेणवे, कसारा, डोळखांब वासिंद, शहापूर, नडगाव, शिरगाव, साजीवली, आटगावसह शहापूर तालुक्याच्या बहुतांश भागाला मोठा फटका बसला. भात पिके, भाजीपाल्यासह वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले.
बदलापूर, अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरात गारांचा पाऊस पडल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले. गारांचा पाऊस पाहण्यासाठी बदलापूरकर खिडकीतून डोकावून पाहत होते. ठाणे पूर्वेत गारांचा पाऊस पडला.
कल्याण, डोंबिवलीत झाडे पडली
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टीएनटी कॉलनी, नांदिवली, मानेरे गाव, कोकण वसाहत, चिकनघर, मुरबाड रोड आदी परिसरात झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.