ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने गुरुवारी काहीशी उसंत घेतल्याचे दिसून आले. ठाण्यात सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात अधूनमधून पावसाने हजेरी लावली. बुधवारी झालेल्या पावसानंतर शहराच्या विविध भागांत गटारांसह त्यातील गाळ रस्त्यावर आल्याचे दिसून आले. गुरुवारी दिवसभरात शहरात ३५.०४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु, या पावसाने कुठेही पडझड झालेली नसल्याची माहिती महापालिकेने दिली. दुसरीकडे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.
गुरुवारी सकाळच्या सत्रात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर हळूहळू शहरावरील काळे ढग दूर झाल्याचे दिसून आले. दुपारी तर सूर्याचे दर्शनही ठाणेकरांना झाले होते. परंतु, सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने पुन्हा जवळजवळ २० मिनिटे हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा बुधवारसारखी परिस्थिती निर्माण होणार की काय, अशी धडकी सर्वांच्या मनात भरली होती. परंतु काही वेळाने पावसानेदेखील उसंत घेतली.
दिवसभरात अवघ्या ३५.०४ मिमी. पावसाची नोंद ठाण्यात झाली. तर आतापर्यंत शहरात ५३९.०५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत अवघा ९०.८६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. त्या तुलनेत यंदा जवळजवळ पाचपट पाऊस झाला आहे. दिवसभरात ८ वृक्ष उन्मळून पडले तर ३ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्या. परंतु, इतर कोणत्याही स्वरूपाची तक्रार आली नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसानंतर गुरुवारी शहराच्या विविध भागांत रस्त्यावर कचऱ्याचा खच पडल्याचे दिसून आले. गटारे, नाल्यातून वाहून आलेला गाळ हा रस्त्यावर पडून असल्याचे दिसून आले. दुसरीकडे शहरात बुधवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहावे तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.