धीरज परब, मीरा रोडकांदळवन, पाणथळ व सीआरझेडचे उल्लंघन करून लोकवस्ती नसतानाही केवळ बिल्डर लॉबी व राजकारण्यांच्या अडकलेल्या अब्जावधी रुपयांच्या भूखंडांपर्यंत जाण्याकरिता मार्ग तयार व्हावा, याकरिता कनकिया येथे पावसाळ्यापूर्वी सुमारे ५ कोटी खर्च करून महापालिकेने बांधलेल्या रस्त्याचा बराच भाग मातीमाफियांच्या हैदोसामुळे चक्क गायब झाला आहे. उर्वरित रस्त्याचा वापर केवळ वाहन पार्किंगसाठी होत असून त्याचीही दुरवस्था असल्याने जनतेचे कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत. ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये जून महिन्यातच कनकिया येथे पालिकेने अनावश्यक रस्ता बांधल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विकास आराखड्यात जेसलपार्क ते घोडबंदर हा खाडीकिनाऱ्यालगत प्रस्तावित रस्ता कांदळवन, पाणथळ व सीआरझेडमुळे बाधित आहे. मात्र, उच्च न्यायालयाचे आदेश व कायदा धाब्यावर बसवत पालिका अधिकारी व काही बिल्डर, राजकारणी यांनी संगनमताने पर्यावरणाचा ऱ्हास करून काही ठिकाणी कच्चा रस्ता तयार केला. केवळ व्यवस्थित मार्ग नसल्याने अडकलेल्या अब्जावधी रुपये किमतीच्या भूखंडांना ‘अॅक्सेस’ तयार होऊन ते मोकळे करून घेण्याची त्यांची धडपड सुरू आहे. रस्त्याला मंजुरी मिळाली नसतानादेखील महापालिकेने कनकिया ते नवघर असा ३० मीटर लांबीचा रस्ता ५ कोटी रुपये खर्च करून तयार केला.रस्ता होणार, हे ग्राह्य मानून लागलीच त्या भूखंडावर बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा पालिकेने लावला आहे. भाजपाच्या एका बड्या नेत्याशी संबंधित कंपनी तेथे क्लब हाउस उभारत आहे. शिवाय, कनकिया जेट्टीचा ठराव करून त्यालगतचे भूखंड विकासाकरिता मोकळे करण्याचाही घाट घातलाआहे. मात्र, या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या मातीमाफियांनी के.डी. एम्पायरपासून नवघरकडे जाणारा नवाकोरा रस्ताच गायब केला आहे. श्रीजी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या रस्त्याचे नामोनिशाणही दिसत नाही. तिवारी महाविद्यालयासमोरील व आजूबाजूच्या परिसरातला रस्ता केवळ वाहन पार्किंगसाठीच वापरला जात आहे. परिणामी, हा ९० फुटी डांबरी रस्ताबांधणीसाठी पालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत. संत होम शाळेजवळ कांदळवनात रस्ता व गटार बांधून पालिकेने पर्यावरणाचा ऱ्हास केला, तर पाणथळ व कांदळवन परिसरात भराव टाकून नव्याने डांबरी रस्ता व गटाराचे बांधकाम केले.
बिल्डरसाठी बांधला; मातीमाफियांनी चोरला
By admin | Published: October 24, 2016 2:01 AM