ठाणे: दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांनी देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातही संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी केली असून वाहनांचीही कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून पाच मिनिटांनी साकेत मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्र म होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर पोलिसांनी यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढले आहे. त्याद्वारे काही सूचना तसेच आवाहनही केले आहे. मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम साकेत मैदानावर होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाभर एकाचवेळी म्हणजे सकाळी ९ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा आयोजित केला जावा, असे पोलिसांनी सूचित केले आहे. दहशतवादी कारवाईची शक्यता लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांनी देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर शहरात येणाऱ्या तसेच जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी केली असून, संशयास्पद वाहनांची आणि व्यक्तींचीही तपासणी केली जात आहे. चौका-चौकांतही पोलीस तैनात केले असून, शहरातील पेट्रोलिंग आणि संशयास्पद ठिकाणांवर अचानक तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणांसह अतिसंवेदनशील ठिकाणीही टेहळणी केली जात आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाणे रेल्वेस्थानकातही बॉम्बशोधक नाशक पथकाद्वारे रेल्वेच्या सुरक्षा दलाचे प्रभारी अधिकारी भूपेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीही करण्यात आली. ठाणे, मुंब्रा, कल्याण आणि जवळपासच्या स्थानकांवर सुरक्षेच्या संदर्भात शोधमोहिमेचा भाग म्हणून मोठ्या संख्येने महिला सुरक्षा दलांनाही तैनात केल्याचे सिंग यांनी सांगितले.