भिवंडी : देशातील पहिले टिळक स्मारक म्हणून ओळख असलेल्या शहरातील टिळक मंदिर सभागृह या ऐतिहासिक वास्तूला नुकतीच ९९ वर्षे पूर्ण झाली. अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेल्या या वास्तूचे यंदाचे शताब्दी वर्ष असून भिवंडी शहराचा टाउन हॉल म्हणून या सभागृहाची ओळख बनल्याचे वाचनमंदिर कार्यकारिणी सदस्य यशवंत कुंटे यांनी सांगितले.महादेव कृष्ण जोगळेकर यांनी १९१८ मध्ये टिळक मंदिराची वास्तू उभारण्यास प्रारंभ केला. जुलै १९२० मध्ये ही वास्तू बांधून पूर्ण झाली. सुरुवातीला या वास्तूला आपल्या वडिलांचे नाव देण्याचे जोगळेकर यांनी ठरवले होते. त्याचवेळी १ आॅगस्टला लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यांची शोकसभा याच सभागृहात झाली. जोगळेकर यांनी टिळकांवरील प्रेमापोटी अखेर या वास्तूला त्यांचे नाव देऊ न त्यांच्या स्मृती जपल्याची माहितीही कुंटे यांनी दिली. या वास्तूत सुरू केलेले मयूरेश वाचनालय २८ जून १९२८ रोजी विश्वस्त मंडळ निर्माण करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याचे १४ आॅक्टोबर १९३३ रोजी वाचनमंदिरात विलीनीकरण झाले. पुढे त्याचे स्थलांतर टिळक मंदिर सभागृहात होऊ न तेव्हापासून या सभागृहाची देखभाल-दुरुस्ती वाचनमंदिरातर्फे केली जात आहे. टिळक मंदिराच्या भिंतींवर चितारलेल्या राष्ट्रपुरु षांच्या चित्रांनी या केंद्राची देशाच्या गौरवशाली इतिहासाशी जोडली गेलेली नाळ स्पष्टपणे दिसत असल्याचे ते म्हणाले.वाचनमंदिरातर्फे झालेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पु.भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, सानेगुरु जी, वसंत बापट, शं.ना. नवरे, विद्याधर गोखले, कुसुमाग्रज आदी साहित्यिकांचा पदस्पर्श झाला आहे.हिराबाई बडोदेकर, राम मराठे, वसंतराव देशपांडे, रामदास कामत यांच्या गायनाचे कार्यक्रमही येथे झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे, राम कापसे, ग.प्र. प्रधान यासारख्या राजकीय नेत्यांनी त्यांचे विचारधन या सभागृहात मुक्तपणे खुले केले.विज्ञान, इतिहास, समाजकारण, राजकारण आदी विषय याच सभागृहात जाणत्या श्रोत्यांसमोर तपशीलवार मांडल्याचे कुंटे यांनी सांगितले.
टिळक मंदिर सभागृहाचे शंभराव्या वर्षात पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:15 AM