उल्हासनगर : बांधकाम विभागातील निविदेच्या वादातून शिवसेना आणि भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांत बुधवारी वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात परस्परांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी निविदेच्या वादातूनच नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यावर महापालिकेत एका ठेकेदाराकडून हल्ला झाला होता.पालिकेत बांधकाम विभागाच्या कार्यालयात दुपारी चारच्या दरम्यान प्रभाग समिती व नगरसेवक निधीतील कामाच्या निविदा उघडण्यात येत होत्या. त्यावेळी प्रभाग १३ च्या शिवसेना नगरसेविका जोत्स्ना जाधव यांचे पती व माजी नगरसेवक सुरेश जाधव यांनी निविदा कोणी भरली, असे विचारले. त्यावेळी माझ्या ओळखीच्या ठेकेदाराने भरल्याची माहिती भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी दिली. त्यातून दोघांत वाद होत पुढे शिवीगाळ, धक्काबुक्की व हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. दोघांनीही समर्थकासह मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला असून बांधकाम विभागातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे चित्रण ताब्यात घेतले आहे.निविदा लहान कामांच्याचउल्हासनगर महापालिकेत कोट्यवधीच्या कामांना विनानिविदा ५,२,२ अंतर्गत मंजुरी दिली जाते. दुसरीकडे काही लाखाच्या कामाच्या निविदा काढण्यात येतात. अशाच निविदेवरून ही हाणामारी झाली. वडोलगाव पुलाचे दीड कोटीचे वाढीव काम, खेमानी नाल्याचे साडेचार कोटीचे वाढीव काम, रस्ता दुरूस्ती व खड्डे भरण्याचे नऊ कोटीचे काम विनानिविदा काढण्यात आल्याची चर्चा महापालिकेत आहे.
उल्हासनगर पालिकेत टेंडरवरून हाणामारी ; परस्परांविरोधात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:38 AM