अंबरनाथ : मुंबई-पुणे महामार्गावर एसटी बसचालकाच्या चुकीमुळे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात अंबरनाथमधील संपूर्ण हातेकर कुटुंबाला अपंगत्व आले आहे. अपघातानंतर एसटीतर्फे जखमींच्या उपचारांचा खर्च करण्यात येणार हाेता. मात्र, पूर्ण बरा होण्याच्या अगोदरच बाळू हातेकर यांना रुग्णालयाने घरी साेडल्यामुळे त्यांचा पाय कापण्याची वेळ आली आहे.
२६ नोव्हेंबरला कुटुंबासह हातेकर मुलीला सातारा येथे सासरी सोडण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना मुंबई-पुणे पळस्पे महामार्गावर एसटी चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका ट्रेलरला धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर १६ जण जखमी झाले होते. गंभीर जखमींमध्ये बाळू हातेकर, त्यांची पत्नी लक्ष्मी आणि मुलीचा समावेश होता. अपघात चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे उघड झाल्यानंतर जखमींचा उपचारखर्च करण्याचे एसटी महामंडळाने आश्वासन दिले हाेते. त्यानुसार बाळू हातेकर यांना सायन रुग्णालयात, तर त्याची पती आणि मुलीला पनवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सायन हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांत ऑपरेशन आणि इतर उपचार करून त्यांना २६ जानेवारीला घरी पाठवण्यात आले. घरी परतल्यानंतर त्याच्या जखमेतून रक्तस्राव होऊ लागला आणि त्याची प्रकृती ढासळली. एसटी महामंडळ उपचार करण्यास प्रतिसाद देत नसल्याने आता उपचारांअभावी पाय कापण्याची वेळ हातेकर यांच्यावर आली आहे. हातेकर यांची प्रकृती खालावल्यानंतर दोनवेळा सायन हॉस्पिटलला नेले, मात्र त्यांनी हातेकर यांना अडमिट करून घेतले नाही. त्यामुळे राज्य सरकारने पर्यायाने परिवहन विभागाने हातेकर याच्या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मला बरे करा. मी माझ्या मेहनतीने कुटुंबाचे पोषण करीन. अपघात झाला, त्याचदिवशी मृत्यू आला असता, तर इतके सोसावे लागले नसते.- बाळू हातेकर, अपघातग्रस्त