कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकानदारांना वेळेचे बंधन घालून दिले गेले असताना आता दुसरीकडे खाद्य आणि शीतपेयांच्या हातगाड्या, फेरीवाले व सर्व प्रकारच्या हातगाड्यांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या सकाळी ७ ते सायंकाळी ७ या दरम्यानच सुरू राहतील, असे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. तर, कोरोना रुग्णांची दररोज झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता संबंधितांना दर शनिवार व रविवारी विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी शनिवार व रविवार सर्व प्रकारच्या हातगाड्यांवर विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही आदेशात आयुक्तांनी नमूद केले आहे.
मनपा हद्दीत कोरोनाचा कहर सुरू आहे. शुक्रवारी ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये लक्षणे विरहीत रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असले तरी दुसरीकडे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकानांना सुरू ठेवण्यास सकाळी १० ते रात्री ९ असे वेळेचे बंधन घातले आहे. त्यामुळे आता फेरीवाले आणि हातगाड्यांना घातलेल्या निर्बंधाला संबंधितांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाच हजार ८५१ रुग्ण, तर १६ जणांचा मृत्यू
मागील १७ दिवसांत कल्याण-डोंबिवलीत पाच हजार ८५१ रुग्ण आढळून आले आहेत. तर, १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे तीन दिवसांत रामनगर पोलीस ठाण्यातील तिघे पोलीस कोरोना बाधित आढळून आले आहेत. डोंबिवलीत वर्षभरात १३३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, तर यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
-------------------