मुंबई – राज्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना अनेक ठिकाणी रुग्णांच्या असुविधेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मीरा-भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार ताजा असताना ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटवर टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ग्लोबल हॉस्पिटलने कमाल केली आहे. ३ जुलै रोजी भालचंद्र गायकवाड नावाचा मृतदेह सोनावणे म्हणून ठाण्यातील कोपरी येथे राहणाऱ्या कुटुंबाला सोपवण्यात आला. पण सोनावणे यांच्यावर ग्लोबल हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये मोरे नावाने उपचार सुरु होते. हा प्रकार हॉस्पिटलच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी सोनावणे यांना ते जिवंत असल्याची माहिती दिली. पुन्हा मध्यरात्री सोनावणे यांचे निधन झाल्याचं कुटुंबाला कळवलं असं त्यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाकडून ३ जुलै रोजी सोनावणे यांच्या कुटुंबीयांना फोन करुन सोनावणे यांचा मृत्यू झाल्याचं सांगितले. त्यानुसार त्यांच्यावर या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या अस्थी देखील देण्यात आले. परंतु ७ जुलै रोजीच सांयकाळी सोनावणे यांच्या कुटुंबियांना फोन करुन सांगण्यात आले की, सोनावणे हे व्हेटिलेटरवर असून ते सुस्थितीत आहेत. तेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली होती. हॉस्पिटलच्या अशा भोंगळ कारभाराचा फटका सोनावणे कुटुंबाला झाला असून आता सोनावणे कुटुंबाला ५ दिवसात आणखी एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे हे दुपारी १२ वाजता सोनावणे कुटुंबाची भेट घेणार आहेत.
दोषींवर कारवाई करा
प्रशासनाच्या चुकांमुळे विरोधकांच्या हाती कोलीत मिळाले असून सत्ताधारी म्हणून आमची बदनामी होत असल्याचे महापौरांनी सुनावले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रुग्णाचा शोध घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले व सत्यशोधनाकरिता चौकशी समिती नियुक्त केली.
दोन दिवसांपूर्वी मीरा भाईंदरच्या डॉ. भीमसेन जोशी रुग्णालयात असाच प्रकार घडला होता. एका महिलेच्या कुटुंबीयांना चक्क रुग्ण मरण पावल्याचा फोन भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातून केला गेला होता. त्यानंतर महिलेच्या नातलगांची रडारड झाली. पण नंतर मात्र चुकून फोन केला गेल्याचे सांगण्यात आले. घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला होता.