लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदिवलीतील श्री स्वामी समर्थनगरचा परिसर जलमय झाला होता. थोडा जरी पाऊस झाला तरी येथे पाणी साचते. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार बंद करण्यात येत असल्याने आम्ही ‘वर्क फ्रॉम होम’ करायचे तरी कसे, असा सवाल येथील संतप्त नागरिकांनी केला आहे. साचलेल्या पाण्यामुळे ऐन कोरोनाकाळात नोकरीवरच पाणी फिरण्याची वेळ आल्याची भावना त्यांनी गुरुवारी व्यक्त केली.
पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांना कंटाळून नांदिवलीतील रहिवाशांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. त्यात परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नांदिवलीत यंदाही पावसाने दाणादाण उडवून दिली. स्वामी समर्थ मठ परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेले होते. त्यामुळे तेथील वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात पाणी साचत असून, केडीएमसीकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सुधारणा झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या अनेकांचे कार्यालयीन कामकाज घरूनच सुरू आहे. मात्र थोडा पाऊस पडला तरी नांदिवली परिसर जलमय होतो. परिणामी वीजपुरवठा खंडित केला जातो. त्याचा मोठा फटका घरून काम करणाऱ्या नोकरदारांना बसत आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सर्वोदय पार्क ते नांदिवली नाला येथे दोन्ही बाजूंनी गटारे बांधणे, गटारांची साफसफाई करणे, ज्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधलेली नाही, अशांवर कारवाई करणे, खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करणे, सखल भागांत लावलेले डीपी महावितरणने त्वरित उंच भागात लावावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
-----------
पाणी साचण्याची समस्या सोडवण्याबाबत १५ दिवसांत कोणतीही कार्यवाही न झाल्यास जनक्षोभास सामोरे जावे लागेल. केडीएमसी विरोधातही आंदोलन उभारले जाईल. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावूनही ते येथे आले नाहीत. त्यामुळे त्यांचाही आम्ही निषेध व्यक्त करतो.
- मनोज घरत, मनसे शहराध्यक्ष, डोंबिवली
----------