मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्थानकाजवळील १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. डिसेंबरअखेर ते पूर्ण होणार असल्याने यंदाही प्रवाशांना गळत्या बोगद्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.ठाणे-दिवा मार्गादरम्यान असलेल्या पारसिक डोंगरात १८७३ साली पारसिक बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. १९१६ रोजी हा बोगदा रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पारसिक बोगद्यातून पाणी गळत आहे. पाणीगळतीमुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसच्या वेगावर निर्बंध येत असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावरदेखील याचा परिणाम होतो. रबरमिश्रीत केमिकलसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बोगद्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. पाणीगळती रोखण्याचा हा आधुनिक आणि परिणामकारक उपाय आहे. पारसिक बोगद्यातील वाहतूक लक्षात घेता, प्रत्यक्ष गळती रोखण्याची कामे विचारपूर्वक करण्यात येतील. दुरुस्ती प्रकल्पासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात बोगद्याची गळती रोखण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१८ ही डेडलाइन निश्चित करण्यातआल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदाही गळक्या बोगद्यातूनच होणार रेल्वे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 6:39 AM