भिवंडी : शासनाच्या हवामान विभागाकडून शासकीय कार्यालयांना दररोजच्या सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा कळविल्या जात नसल्याने सरकारी व निमसरकारी कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयांच्या आवारात लावलेला ध्वज दिनदर्शिकेतील वेळेनुसार उतरवित आहेत. वास्तविक, सूर्योदयाच्या वेळी ध्वज लावावे व सूर्यास्तानंतर ध्वज उतरवावे, असे निर्देश शासनाच्या ध्वजसंहितेत दिले आहेत. त्यानुसार, शासकीय व निमशासकीय कार्यालयांत तिरंगा झेंडा लावून उतरविला जातो. १५आॅगस्ट स्वातंत्र्य दिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १ मे महाराष्ट्र दिन आणि ध्वजसप्ताह या दिवशी शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच इतर ठिकाणी झेंडावंदन करण्यासाठीच्या वेळा ठरवून दिल्या जातात आणि सूर्यास्तानंतर झेंडा उतरविण्याचे सांगितले जाते. या दिवशी सर्वसामान्य नागरिक व सार्वजनिक संस्था झेंडावंदन करून देशप्रेम व्यक्त करतात. अशा वेळी शासनाने वर्तमानपत्रातील जाहिरातीत सूर्यास्ताच्या या वेळा दर्शविल्यास ध्वजवंदनाचा सन्मान वाढण्यास मदत होणार आहे. शासनाकडून सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ जाहीर केली जात असली तरी निमशासकीय कार्यालयांपर्यंत ती वेळ पोहोचत नसल्याने त्या कार्यालयांतील झेंडा उतरविणारा कर्मचारी विविध छापील दिनदर्शिकांचा आधार घेऊन झेंडा उतरवित आहे. पूर्वी काही शासकीय कार्यालयांबाहेर सूर्योदय व सूर्योदयाच्या वेळा दर्शविणारे उपकरण व सोबत घड्याळ लावलेले असायचे. ते भिवंडीतील प्रमुख शासकीय व निमशासकीय कार्यालयांत दिसत नाही. सध्या दिवस मोठा असल्याकारणाने झेंडा उतरविला जात नसल्याच्या तक्रारी शहरातील दक्ष व जागरूक नागरिक करीत आहेत. शासनाचे हवामान खाते असताना त्यामार्फत सूर्यास्ताची वेळ शासनाच्या वेबसाइटवर जाहीर केली पाहिजे. तसेच एक महिन्याचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर झाल्यास शासकीय कार्यालयांना व नागरिकांना त्याची माहिती होईल, अशी माहिती दक्ष नागरिकांनी दिली. (प्रतिनिधी)
ध्वज उतरतात दिनदर्शिकेतील वेळेनुसार
By admin | Published: July 21, 2015 4:43 AM