ठाणे : सकाळी ऐन गर्दीच्या वेळी होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी तीनहातनाका ते कोपरी हा मुंबईकडे जाणारा सेवारस्ता सकाळी आणि सायंकाळी काही काळासाठी एकमार्गी करण्यात आला आहे. इतर वेळी याठिकाणी दुतर्फा वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेने दिलीसध्या रेल्वे सेवा मर्यादित असून ठरावीक प्रवाशांसाठी सुरू आहे. खासगी वाहनाने मुंबईत जाणारे चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ठाण्यातून सकाळी मुंबईकडे जाणारे आणि सायंकाळी मुंबईतून ठाण्यात येणारी वाहने यांची संख्याही लक्षणीय आहे. ठाण्यात ती आल्यानंतर तीनहातनाका ते कोपरी या मार्गावर अरुंद पुलामुळे वाहतूककोंडी होत असते. ती होऊ नये, यासाठी ४ नोव्हेंबरपासून सकाळी ८ ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबईकडे जाणारा सेवारस्ता दोन्ही बाजूऐवजी केवळ मुंबईकडे जाण्यासाठी खुला ठेवण्यात येणार आहे. त्याचवेळी कोपरी ते तीनहातनाका येणारा सेवारस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान हाच रस्ता कोपरी ते तीनहातनाका असा वाहनांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. इतर वेळी ही वाहतूक दोन्ही मार्गाने सुरू राहणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक हे नियमन केल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
दिवाळीनिमित्त काही मार्ग केले खुलेठाणे शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गेले सात महिने बंद ठेवण्यात आलेला जांभळीनाका ते ठाणेनगर पोलीस ठाण्यापर्यंतचा मार्ग आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. याठिकाणी लावलेले बॅरिकेट्सही काढण्यात आले आहे. हा रस्ता दिवाळीच्या बाजारामुळे केवळ दुचाकींसाठी खुला राहणार आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जांभळीनाका हा रस्ताही पूर्णपणे बंद होता. तोही आता बुधवारपासून सुरू केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.