बदलापूर : बदलापूरमध्ये महिनाभरापासून टँकरलॉबी मोठ्या प्रमाणात नफेखोरी करण्यात व्यस्त झाली आहे. शहरातील अनेक इमारतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक सोसायट्या या टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहत आहेत. त्यामुळे या सोसायटीच्या पत्रावर टँकरमालक जीवन प्राधिकरणाकडून २२० रुपयांमध्ये टँकर भरून घेतात आणि त्या टँकरची १२०० ते १५०० विक्री करतात. पाणीटंचाईचा सर्वात मोठा फायदा हा बदलापुरातील टँकरलॉबी घेत आहे. दुसरीकडे बदलापुरातील पाणीटंचाई पाहता रोज २५० ते ३०० टँकरची गरज आहे. ती पुरवण्याची क्षमता पालिका आणि जीवन प्राधिकरणाकडे नाही. त्यामुळे बाहेरील टँकरलॉबी आपले टँकर हे २५०० ते ३०००मध्ये पाणी विकत आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पालिका प्रशासन यांना शहरातील पाणीटंचाई दूर करण्यात अपयश आले आहे. शहरात अनेक इमारतींना पाणीपुरवठा होत नसल्याने त्या सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. शहरात अनेक इमारती केवळ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तर, काही सोसायट्यांमध्ये कूपनलिका असून पिण्यासाठी नागरिकांना टँकरचे पाणी मागवावे लागत आहे. शहरात रोज २५० ते ३०० टँकर पाण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात एवढे टँकर देण्याची परवानगी जीवन प्राधिकरणाकडे नाही. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या सोसायट्यावगळता इतर ठिकाणी पाणी टँकरने देणे शक्य होत नाही.
बदलापूरमधील खरवई येथील जीवन प्राधिकरणाच्या केंद्रातून रोज ५० टँकर देण्याची परवानगी आहे. त्यासाठी प्राधिकरण २२० रुपये आकारत आहे. मात्र, आठ ते दहा हजार लीटर क्षमतेचे टँकर नागरिकांना १२०० ते १५०० रुपयांना मिळत आहे. पाण्याची गरज असल्याने सोसायट्याही वाढीव दराने हे पाणी घेत आहेत. टँकरमालकाला प्रत्येक टँकरमागे हजार रुपये मिळतात. टँकरचा डिझेल आणि चालकाचा पगार वगळता इतर पैसे टँकरमालकाला मिळतात. एक टँकर दिवसाला पाच ते सहा फेऱ्या करतो. त्यामुळे टँकरमालकाला एका टँकरमागे पाच ते सहा हजारांचा नफा होतो. टँकरलॉबी सक्रिय झाल्याने प्राधिकरण आणि पालिकेने स्वत: नेमलेल्या टँकरद्वारेच टंचाईग्रस्त भागाला पाणी देण्याची मागणी होत आहे. तसेच टँकरवर जीपीएस यंत्रणा नसल्याने कोणते टँकर कुठे पाणी टाकतात, याची माहिती कुणालाच मिळत नाही.
खरवई येथून ५०, बदलापूर अग्निशमन केंद्र येथून ५० असा रोज १०० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पुरवठा करणाऱ्या टँकरपैकी सर्व टँकर हे राजकीय नेत्यांचे आहेत. ज्या भागातील सोसायट्यांना पाणीच नाही, त्या सोसायट्या मिळेल त्या दरात टँकर मागवत आहेत. शहरातील इतर टँकरलॉबी सरासरी अडीच ते तीन हजारांत टँकर देत आहेत. काही टँकरचालक उल्हास नदीतून पाणी उचलून ते थेट पिण्याचे पाणी म्हणून सोसायटीला देतात. ज्या भागात पाणीच येत नाही, त्यांना काही टँकरचालक उल्हास नदीचे पाणी देतात. बांधकामासाठीही तेच पाणी दिले जाते. बदलापूरमध्ये प्रत्येक विभागात टँकरलॉबी सक्रिय झाली असून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त होत आहे.बदलापूरमध्ये अनेक सोसायट्यांना टँकरची गरज लागते. २५० ते ३०० टँकरची गरज असताना त्यांना स्वस्तात टँकर उपलब्ध करून देण्याची गरज आहे. इतकेच नव्हे तर बदलापूर शहर टंचाईग्रस्त शहर म्हणून जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे. - शैलेश वडनेरे, नगरसेवकपालिकेवर मुजोरीबदलापूरमध्ये एक टँकर भरण्यासाठी प्राधिकरण २२० रुपये आकारते. ते पाणी घेऊन पालिकेचे टँकर ६०० रुपयांत नागरिकांना पाणीपुरवठा करतात.च्मात्र, टँकरलॉबीची मुजोरी इतकी वाढली आहे की, पालिकेचा स्वस्त टँकर तसाच उभा ठेवला जातो.च्तो टँकर न वापरता खाजगी टँकर वापरण्याची यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यामुळे पालिकेचे स्वस्त टँकर बाहेरच पडत नाही.