ठाणे - एकीकडे ठाणे परिवहन प्रशासन उत्पन्न वाढविण्यासाठी विविध स्त्रोतांचा आधार घेत असतांना दुसरीकडे मात्र किरकोळ दुरुस्तीसाठी तब्बल १२ एसी व्हॉवो बसेस मागील दिड महिन्यापासून आगारात धूळ खात पडून असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत याच मुद्यावर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. वेळेवर बिले अदा केली जात नसल्यानेच या बसेसची दुरुस्ती होऊ शकली नसल्याचा गौप्यस्फोट यावेळी परिवहन प्रशासनाने केला. ठाणे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बसेसपैकी केवळ १८५ बसेस आज रस्त्यावर धावत आहेत. त्यातील २० ते २५ बसेस रोज ब्रेकडाऊन होऊन आगारात येत असल्याचा मुद्दा सदस्य राजेश मोरे यांनी उपस्थित केला. शिवाय १०० बसेस या किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात पडून आहेत. त्या बसेसची दुरुस्ती का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. परंतु एसी बसेसचे उत्पन्न जास्त असतांना देखील १२ बसेस बंद अवस्थेत का आहेत, त्या केव्हा पासून आगारात पडून आहेत, असे अनेक सवाल सदस्य तकी चेऊलकर यांनी उपस्थित केले. परंतु याचे उत्तर परिवहन प्रशासनाने देण्याऐवजी शिवसेनेचे सदस्य राजेंद्र महाडीक यांनीच या बसेस तब्बल दिड महिन्यापासून केवळ किरकोळ दुरुस्तीसाठी बंद असल्याचा मुद्दा स्पष्ट केला. या बसेस बंद असल्याने त्यातून मिळणाºया उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. बुडालेले उत्पन्न कोण भरुन देणार असा सवालही यावेळी सदस्यांनी उपस्थित केला. यावर परिवहनने देखील केवळ आधीची बिले वेळेवर न निघाल्यानेच या बसेसची दुरुस्ती होऊ शकली नसल्याचे स्पष्ट कबुली सभेला दिली. त्यामुळे सदस्य आणखीनच तापल्याचे दिसून आले. अखेर यावर प्रशासनाने सारवासारव करीत या बसेस लवकरात लवकर दुरुस्त केल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच १०० बसेस टप्याटप्याने दुरुस्त करुन त्या देखील रस्त्यावर आणल्या जातील असे आश्वासन दिले.दुरुस्तीवर दिड कोटी खर्चूनही बसेस रस्त्यावर नाही...दुरुस्तीसाठी निधी नसल्याची ओरड केली जात असली तरी देखील मागील काही महिन्यात बसेस दुरुस्तीसाठी तब्बल दिड कोटींचा खर्च करण्यात आला असून केवळ काहीच बसेस रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत बसेस कुठे गेल्या, खर्च कुठे केला गेला असा सवाल राजेश मोरे यांनी उपस्थित केला. परंतु यावर प्रशासनाकडून अपेक्षित असे उत्तर मिळाले नाही.
बिल थकल्याने ठाणे परिवहनच्या १२ व्हॉल्वो बसेस दिड महिन्यापासून दुरुस्तीसाठी आगारात धुळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 5:29 PM
मागील दिड महिन्यापासून परिवहनच्या १२ व्हॉल्वो बसेस किरकोळ दुरुस्तीसाठी आगारत धूळ खात पडून असल्याची माहिती परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. त्यातही आधीचे बिल न दिल्याने या बसेसची दुरुस्ती रखडल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली आहे.
ठळक मुद्देनादुरुस्त एसी बसेसमुळे लाखोचे नुकसानदिड कोटी खर्च करुनही बसेस रस्त्यावर नाही