टिटवाळा : किमुरा शोकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडिया यांच्या वतीने रविवार सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली येथे 8 व्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी सुमारे 255 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
टिटवाळा शहरातील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे प्रशिक्षण घेणारे 59 खेळाडु या स्पर्धेत सहभागी झाले होते. हे सर्व स्पर्धक कराटे मध्ये कुमीते व काता या दोन मुख्य प्रकार असलेल्या स्पर्धेत विविध वयोगट व वजन गट यात सहभाग घेतला होता. त्यांना आपले प्राविण्य दाखवत सदर स्पर्धैत अनुक्रमे 25 सुवर्ण पदके, 40 रौप्य पदके व 45 कांस्य पदके अशा प्रमाणे विविध गटात एकूण 110 पदके पटकावली आहेत.
स्पर्धेत विविध गटात घेण्यात आलेल्या सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांची पुन्हा एकदा ग्रँड चँपियन ट्रॉफी साठी लढत घेण्यात आली. टिम चँपियन ट्रॉफी साठी सहभागी स्पर्धकांची संख्या व पदके यांची पडताळणी करून सर्वाधिक स्पर्धक व सर्वाधिक पदक विजेते म्हणून निवडण्यात आले. त्यानुसार विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन, टिटवाळा या संघाला हे दोन्ही सन्मानचिन्ह प्राप्त झाले. तर ग्रँड चँपियन ट्रॉफीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत टिटवाळा येथील एकमेव स्पर्धक कुशल तिवारी याने आपले कौशल्य पणाला लावुन या ट्रॉफी वर स्वतःचे नाव कोरले. सदर स्पर्धेत सुवर्णपदक मिळालेल्या टिटवाळयातील स्पर्धकांची निवड साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या जागतिक कराटे स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
सदर राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन, टिटवाळाचे संचालक प्रमुख प्रशिक्षक, राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे सर व गणेश गायकवाड यांच्या सोबत संतोष जाधव, समाधान कोंडावळे, प्रविण साबळे, साहिल कातडे, गौरी तीटमे, हर्षदा पाडेकर, आकांक्षा जाधव, पूजा कोंडावळे, कुशल तिवारी, धनश्री नलावडे, कृष्णा परदेशी, वैष्णव जगताप, गौतम दिवटे व अवध यादव यांनी या स्पर्धेत पंच म्हणुन कार्य केले व सदर स्पर्धेचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले.