ठाणे : यंदा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रस्त्यांवर प्रमाणापेक्षा जास्त खड्डे पडले आहेत. ठाणे शहरातही मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांवरून यंदाही चांगलेच राजकारण तापल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, १० दिवसांत खड्डे बुजवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत खड्डे बुजवण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने शहरातील किती प्रमाणात खड्डे बुजवले आहेत, याची पाहणी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल करणार आहेत.जिल्ह्याच्या विविध भागांत यंदा झालेल्या पावसाने सर्वच शासकीय यंत्रणांची पोलखोल केली आहे. सर्वच भागांत रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. शासकीय यंत्रणा खड्डे बुजविण्याच्या कामात अपयशी ठरल्याचेही दिसून आले आहे. पालकमंत्र्यांनीदेखील १० दिवसांत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. परंतु, आजही जैसे थे परिस्थिती आहे. आता घटस्थापना झाली असून रस्त्यांवर खड्डे तसेच आहेत. दरम्यान, सोमवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिका मुख्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शहरातील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजविण्याचे त्यांनी आदेश दिले.यावेळी त्यांनी शहरातील खड्ड्यांचा आढावा घेतला असून त्यानुसार पुढील कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ३ आॅक्टोबरला आयुक्त स्वत: शहरातील रस्त्यांची पाहणी करणार असून खड्डे किती प्रमाणात भरले गेले, का भरले गेले नाहीत, त्यामध्ये काय अडचणी आहेत, याची माहिती घेणार आहेत.प्रचारात गाजणार मुद्दाशहरातील विविध भागांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हा मुद्दा विधानसभा निवडणुकीतही गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजवावेत, अशी मागणीही लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
ठामपा आयुक्त करणार खड्ड्यांची पाहणी , ३ ऑक्टोबरला दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 1:53 AM