ठाणे : ठाणे महापालिकेत तीन जागांसाठी लवकरच पोटनिवडणुका होण्याची चिन्हे असून यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. पोटनिवडणुकांच्या कामांसाठी निविदादेखील प्रसिद्ध केल्या आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी आणि भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचे निधन, तसेच मुंब्र्यातील नगरसेविका हसीना शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. २०२२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याची चिन्हे असल्याने पोटनिवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांना आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मुकुंद केणी यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. कळव्यात केणी कुटुंबीयांचे प्राबल्य आहे. या ठिकाणी त्यांचे पुत्र मंदार केणी उभे राहण्याची शक्यता असून ते बिनविरोध येण्याची चिन्हे आहेत. प्रमिला केणी यांनी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यापूर्वी विरोधी पक्षनेते पद भूषविले असून केणी कुटुंबीयांचे सर्वच पक्षात चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना ही पोटनिवडणूक सोपी जाऊ शकते.भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. ते सेनेच्या बालेकिल्ल्यात निवडून आले होते. त्यामुळे ही जागा मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही असून, या ठिकाणी चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.
मुंब्य्रात येणार रंगतमुंब्र्याच्या एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका हसीना शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक लावण्यात येणार आहे. या ठिकाणीदेखील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.