ठाणे: घोडबंदर रोडकडून ठाण्याकडे निघालेल्या ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसने उभ्या असलेल्या टँकरला जाऊन धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६.१५ वाजण्याच्या सुमारास वाघबीळ येथे घडली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नसून बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
टीएमटी चालक सागर आपोटिकर हे शुक्रवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सहा प्रवासी घेऊन कासारवडवली येथून ठाणे स्टेशनला निघाले होते. याचदरम्यान बसचा ब्रेक फेल झाल्याने त्या बसने रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या एका टँकरला मागून धडक दिली. या अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांसह अग्निशमन दलाने मदतीसाठी धाव घेतली.या दोन्ही विभागांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तसेच तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. बसमधून प्रवास करीत असलेले सर्वच सहा प्रवासी ोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.