ठाणे : ठाण्यातील अंबिकानगर येथे असलेला टीएमटीचा बसस्टॉप अचानक गायब झाला आहे. रातोरात बसस्टॉप चोरीला गेल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. स्वत:च्या फायद्यासाठी चक्क बसथांबा काढून टाकणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
वागळे इस्टेट रोड क्र मांक ३३ येथील अंबिकानगर रस्त्यावर गेल्या २५ वर्षांपासून टीएमटीचा बसथांबा होता. मात्र, अचानक एका रात्रीत तो गायब झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये बसथांब्याची शोधाशोध सुरू झाली आहे. या बसथांब्याच्या बाजूलाच इमारतीचे बांधकाम सुरू असून ते शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांचे असल्यानेच येथील बसथांबा त्यांच्या माध्यमातून रातोरात हटवल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. हा बसथांबा लवकरात लवकर लावण्यात यावा, अशी मागणी यावेळी स्थानिक नागरिकांसह आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच महापालिका प्रशासन व शिवसेनेविरोधातघोषणाबाजी केली.अंबिकानगर येथे बसथांबा काढून टाकण्यात आला असल्याची बाब खरी आहे. मात्र, तो पालिका प्रशासनाकडून परवानगी घेऊनच काढला आहे. आंदोलकांचा आरोप चुकीचा असून माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.- एकनाथ भोईर, स्थानिक नगरसेवक