लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टीएमटीची सेवा मागील काही महिन्यांपासून सुधारत असली तरीदेखील आजही वेळेवर बसमिळण्याची शास्वती नाही. मध्येच त्या बंद पडणे, उशिराने धावणे, काही ठराविक मार्गाकडे दुर्लक्ष आणि एकूणच परिवहनचा कारभार पारदर्शकपणे चालविण्यासाठी नवनिर्वाचित सभापती अनिल भोर हे प्रवाशांच्या सेवेसाठी एक व्हॉट्सअॅप क्रमांक आणि इ मेल आयडी तयार करणार आहेत. त्यावर प्रवाशांना थेट सभापतींकडे तक्रारी करता येणार आहेत. येत्या आठवडाभरात ही सेवा सुरु केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३१७ बस आहेत. परंतु प्रत्यक्षात २०० च्या आसपास रस्त्यावर धावत आहेत. ठेकेदाराच्या बस आता रस्त्यावर धावण्यास सुरवात झाली आहे. परंतु त्या वेळेवर धावत असून परिवहनच्या बस मात्र उशिराने धावत आहेत. काही मार्गांवर तर त्या दिसत नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी परिवहनचे उत्पन्न मागील काही दिवसात २२ लाखांवरुन ३० लाखांच्या घरात गेले आहे. यामुळे कामगारांची थकीत देणी देण्यास पालिकेने अनुकुलता दर्शवूत ३५ पैकी १५ कोटींची देणी कामगारांच्या बँक खात्यात जमा केली आहेत.परंतु,कार्यशाळेच्या अनास्थेमुळे परिवहनच्या बस आजही वेळेवर डेपोतून बाहेर पडू शकत नाहीत, किरकोळ कारणासाठी त्या उभ्या आहेत. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. शिवाय मध्येच बस बंद पडणे, काही मार्गांवर तासन्तास बसेस नसणे, प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणे, अशा एक ना अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी भोर यांनी प्रयत्न सुरु केले. त्यानुसार एक मेल आयडी तयार करण्यात येणार असून तो थेट सभापतींना पाहता येणार आहे. यावर प्रवाशांना परिवहन बाबत चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या समस्या टाकता येणार आहेत. त्यावर तत्काळ उपाय योजना सुचविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय व्हॉट्सअॅप क्रमांक तयार करणार असूनही त्यावर परिवहन संदर्भात काही व्हीडीओ, फोटो अथवा इतर काही समस्या असल्यास टाकता येऊ शकेल.आठवड्याभरात सुरुवातयेत्या आठवडा भरात ही सुविधा सुरु केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार परिवहनच्या प्रत्येक बसमध्ये मेल आयडी आणि व्हॉट्सअॅप क्रमांकांचे स्टीकर लावले जाणार असून परिवहनच्या चौक्यांमध्येदेखील उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
टीएमटीच्या तक्रारी व्हॉट्सअॅपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:27 AM