ठाणे : जेएनएनयूआरएमअंतर्गत घेण्यात येणाऱ्या १९० बसखरेदीत आता साडेतीन कोटींचा भुर्दंड परिवहनला सहन करावा लागणार आहे. याबाबतच्या या वाढीव खर्चाच्या प्रस्तावास शुक्र वारच्या महासभेत विरोधकांनी कडाडून विरोध केला. विशेष म्हणजे या बसेस ज्या ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत, त्यांच्या दरात आणि लगतच्या नवी मुंबई महापालिकेच्या दरात मोठी तफावत असल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यामुळे ठेकेदाराला सुमारे १०० कोटींचा फायदा होणार असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. मात्र, वेळेअभावी महासभा तहकूब झाल्याने या प्रस्तावावर आता मंगळवारी चर्चा होणार आहे. या ठेकेदाराला टीएमटीच्या वतीने ६६, तर मिडीबस चालवण्यासाठी ५३ रु पये याप्रमाणे दर आकारला आहे. ही दरनिश्चिती सुमारे १० वर्षांसाठी केलेली आहे. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबईमध्ये व्होल्वोच्या एसी बसगाड्या चालवण्यासाठी हाच दर प्रतिकिलोमीटर ५९ व ३१ रु पये इतका आकारला आहे. या चुकीच्या ठेक्यामुळे ठामपाला सुमारे ५०० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर (जि.) अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.
टीएमटीत भ्रष्टाचार
By admin | Published: September 25, 2016 4:34 AM