जितेंद्र कालेकर, ठाणेठाणे परिवहन सेवेची (टीएमटी) ठाणे स्टेशन ते कोलशेत ही बस कापूरबावडीऐवजी टॅकसन कंपनीमार्गे अचानक सुरू करण्यात आली आहे. पाच बसथांबे वगळून या बसने शॉर्टकट मारल्याने शेकडो विद्यार्थ्यांसह प्रवाशांना फटका बसला आहे. या प्रकाराबद्दल दाद न देणाऱ्या परिवहन व्यवस्थापकांसह अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी चांगलेच धारेवर धरले.ठाणे ते कोलशेत या मार्गावर आधीच ठरावीक बसेस आहेत. त्यात कापूरबावडीमार्गे जाणारी मार्ग क्र. ९५ ही बस पाच थांबे वगळून टॅकसन कंपनीमार्गे ढोकाळी-कोलशेत अशी सुरू करण्यात आली आहे. आधी हीच बस ठाणे स्टेशन- मखमली- माजिवडा-कापूरबावडी जंक्शन-छाबय्या पार्क-यशस्वीनगर- यशस्वीनगर पाइपलाइन- हायलॅण्ड- श्रुतीपार्कमार्गे ढोकाळी आणि कोलशेतला जात होती.कोलशेतला जाणाऱ्या काही ठरावीक प्रवाशांनी आपला वेळ वाचविण्यासाठी ही बस शॉर्टकट मारून अन्य मार्गाने घेण्याची मागणी टीएमटीकडे केली. त्याला व्यवस्थापनाने कोणतेही सर्वेक्षण न करता मान्यता दिल्याने ती गेल्या आठ दिवसांपासून सुरूही करण्यात आली. त्यामुळे कापूरबावडी, छाबय्या पार्क, यशस्वीनगर, यशस्वीनगर पाइपलाइन, हायलॅण्ड सोसायटी आणि श्रुतीपार्क या पाच थांब्यांवर ही बस आता येत नसल्याने तेथील शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. पूर्वीच्या मार्गावर येथील विद्यार्थ्यांना पासेसही देण्यात आले आहेत, त्यांचाही विचार न करता ती अचानक २० नोव्हेंबरपासून बंद करून दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आल्याने विद्यार्थी आणि महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भोईर यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन परिवहन व्यवस्थापक सुधीर सावंत यांना फोनवरून याबाबत जाब विचारला. तेव्हा आपण सर्व्हे करू इतकेच त्रोटक उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर, फोन घेणार नसल्याचे त्यांनी सुनावले. याप्रकरणी त्यांनी पालिका आयुक्तांकडेही राऊत यांची तक्रार केली.दरम्यान, संतापलेल्या भोईरांनी वाहतूक अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक दिलीप कानडे, सचिन दिवाडकर या अधिकाऱ्यांना या प्रकरणावरून चांगलेच फैलावर घेतले. ही बस पूर्ववत झाली नाहीतर चक्काजाम आंदोलनाचाही इशारा दिला. तर, ज्या पाच थांब्यांवर ही बस येत नाही, तेथील शेकडो प्रवाशांनी ती पूर्ववत करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.ढोकाळीहून थेट माजिवडा ही नव्याने बस सुरू झाल्याने त्यामध्ये केवळ टॅकसन कंपनीचा एकमेव थांबा येतो. तिथे फारसे प्रवासी नसतात. तिथला एखादा प्रवासी श्रुतीपार्क येथे येऊ शकतो. ते अंतर अवघ्या एका मिनिटाचे आहे. मात्र, तो विचार न करता आधीचे पाच बसथांब्यांवरील हजारो प्रवासी असताना टीएमटीने नव्या कमी थांब्यांवरील ही बस सुरू केल्याची बाब येथील दीडशे ते दोनशे प्रवाशांनी स्थानिक नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्या निदर्शनास आणून दिली.
टीएमटीच्या प्रवाशांना फटका
By admin | Published: December 07, 2015 1:06 AM