लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : डिझेलसह सीएनजीचे वारंवार वाढत जाणारे दर, परिवहनमध्ये असलेल्या जुन्या बस, जीएसटीमुळे वाहनांच्या किमतीत झालेली वाढ आणि मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मागील वर्षी फेटाळलेली दरवाढ यंदा पुन्हा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, तिकीटदरात २ ते १२ रुपयांपर्यंतची वाढ प्रस्तावित करून तसा प्रस्ताव २० फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, सत्ताधारी तो मंजूर करणार की, ठाणेकरांना बेस्टप्रमाणे दिलासा देणार, याकडे लक्ष लागले आहे.परिवहनसेवेने मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही दरवाढ प्रस्तावित केली होती. परंतु, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून परिवहन समितीने ती फेटाळली होती. महासभेतदेखील हा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न झाला होता. आता वर्षभरानंतर प्रशासनाने पुन्हा ठाणेकरांवर २० टक्के तिकीटदरवाढ लादण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात डिझेल व सीएनजीदरात झालेली लक्षणीय वाढ, परिवहनसेवेत असलेल्या जुन्या बसमुळे डिझेलचा होणारा जास्त वापर तसेच शासनाने कार्यान्वित केलेल्या जीएसटीमुळे वाहनांच्या सुटे भाग खरेदी किमतीत झालेली दरवाढ यासह धक्कादायक म्हणजे सध्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे कारणही प्रशासनाने भाडेवाढीमागे दिले आहे. यामुळे परिवहनसेवेच्या दैनंदिन महसुली तुटीमध्ये वाढ होत आहे. ती भरून काढण्यासाठी इतर उत्पन्नाच्या स्रोतांबरोबर भाडेवाढ प्रस्तावित केली आहे.तिकीटदरात २० टक्के भाडेवाढ केल्यास दैनंदिन ३.४० लाख, तर वर्षाला नऊ कोटी ३५ लाख उत्पन्नवाढीचे नियोजन धरले आहे. यामुळे कमाल सात रुपये असणारे भाडे नऊ रुपये होणार आहे. पुढील प्रत्येक टप्प्यासाठी दोन रुपयांनी भाडेवाढ असणार आहे. ही भाडेवाढ २ ते १२ रुपयांपर्यंत जाणार आहे.अशी आहे भाडेवाढपहिल्या टप्प्यासाठी दोन रु पये आणि शेवटच्या टप्प्यासाठी पाच रुपये दरवाढ प्रस्तावित केली आहे. वातानुकूलित बससाठी केवळ १२ रु पये भाडेवाढ सुचवली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यासाठी असणारे ३६ रुपयांचे भाडे ४८ रुपयांपर्यंत जाणार आहे.प्रशासनाच्या प्रस्तावाबाबत काय करायचे, याचा अधिकार महासभेला आहे, त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करायचा की बेस्टच्या धर्तीवर ठाणेकरांना सवलत द्यायची, याचा निर्णय महासभाच घेईल.- नरेश म्हस्के, महापौर, ठामपा
टीएमटीच्या तिकीटदरात २० टक्के होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:14 AM